कागदावर लिहून ठेवला मोबाईलचा पासवर्ड अन्…,निवासी युवा डॉक्टरने वसतिगृहात संपवलं जीवन, पुण्यातील घटना

पुणे : पुण्यात एका तरुण डॉक्टरने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये काम करणारे निवासी डॉक्टर श्याम व्होरा (वय.२८) यांनी राहत असलेल्या डॉक्टर्सच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे.
तसेच श्याम व्होरा यांनी रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली आहे. बराच वेळ दरवाजा बंद असल्याने सुरक्षा रक्षकाला संशय आला, यानंतर त्यांनी दरवाजा उघडून पाहिलं असता, श्याम व्होरा हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकपासून ३०० मीटर अंतरावर असलेल्या ढोले पाटील चौकात दामोदर भवन ही इमारत आहे. या इमारतीत डॉक्टरांना राहण्यासाठी हॉस्टेल बांधण्यात आलं आहे. या हॉस्टेलमध्ये जवळपास ८० ते १०० डॉक्टर राहतात.
याच हॉस्टेलमध्ये २८ वर्षीय श्याम व्होरा यांनी आयुष्याचा शेवट केला. त्यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची माहिती रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाही. मात्र रुग्णलयातील एका वरिष्ठ डॉक्टरांच्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, डॉ. श्याम व्होरा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एका कागदावरती आपल्या मोबाइलचा पासवर्ड लिहून ठेवलेला आढळून आला आहे. यामुळे या आत्महत्येचे गूढ लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. डॉ. व्होरा हे रुबी रुग्णालयात गेल्या वर्षभरापासून रेडिओलॉजी डायग्नोसिस विभागात निवासी वैद्यकीय डॉक्टर म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.