बंगळुरुतील दुर्घटनेनंतर आरसीबीचा मोठा निर्णय, मृतांच्या कुटुंबियांना ‘एवढ्या’ लाख रुपयांची मदत जाहीर..

बंगळुरू : बंगळुरूमध्ये बुधवारी ४ जून रोजी झालेल्या दुर्घटनेमुळे आरसीबीच्या विजयाला गाळबोट लागलं. एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत आरसीबीच्या ११ चाहत्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.
या दुर्घटनेनंतर RCB फ्रँचायझीनं मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी मृत ११ चाहत्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रत्येकी ₹१० लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. यासोबतच ‘RCB Cares’ नावाचा एक विशेष निधी तयार केला जाणार असून, भविष्यातील अशा अडचणीत RCB चाहत्यांच्या मदतीसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. दरम्यान, RCB ने सोशल मीडियावरून अधिकृत निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.
आरसीबीने सोशल मीडियावरुन अधिकृत निवेदनाद्वारे आर्थिक मदत देत असल्याचं जाहीर केलं. आरसीबीच्या खेळाडूंचा एका बाजूला सत्कार सुरु होता. तर दुसऱ्या बाजूला मैदानाबाहेर चाहत्यांची चेंगराचेंगरी सुरु होती. त्यामुळे खेळाडू किती असंवेदनशील आहेत, असा आरोपही करण्यात आला.
या सर्व दुर्घटनेनंतर आरसीबीने निवेदनाद्वारे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याचं म्हटलं. तसेच याबाबत दुर्घटनेबाबत माहिती होताच कार्यक्रम थांबवून प्रशासनला सहकार्य केल्याचं या निवदेनात म्हटलं. मात्र तेव्हा आरसीबीने आर्थिक मदत जाहीर केली नव्हती. मात्र त्यानंतर काही तासांनी अखेर आरसीबीने मनाचा मोठेपणा दाखवत आपल्या टीमच्या मृत्यू पावलेल्या चाहत्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.