पुणे-सोलापूर मार्गावरील वाहतूक सुसाट होणार! हडपसर-यवत सहा पदरी उड्डाणपूलाला मंजुरी, काळभोर पर्यंत मेट्रो झाल्यास ‘या’ गावांना दिलासा..

पुणे : मागील दोन दशकांपासून पुणे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. ती फोडण्यासाठी राज्य शासनाने हडपसर ते यवतपर्यंत सहा पदरी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, या निर्णयाला सोमवारी (ता. २) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. तर लोणी काळभोर पर्यंत मेट्रो झाल्यास पूर्व हवेलीतील ७ गावांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सहा पदरी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला असून प्रशासनाने त्यासाठी 5 हजारहून अधिक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तर सध्या स्थितीत असलेल्या पुणे सोलापूर रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असून हा रस्तादेखील सहा पदरी करण्यात येणार आहे.
हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या महामार्गावरील वाहतुकीची कोंडी सुटणार आहे. या सर्व प्रकल्पासाठी ५ हजार २६२ कोटींच्या खर्चासही शासनाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पाचे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत केले जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव प्रज्ञा वाळके यांनी काढले आहेत.
दरम्यान, या प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे देण्यात आली आहे. या प्रकल्पाचे काम बांधा, चालवा व हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर केले जाणार आहे. हे काम पूर्ण झाल्यावर या रस्त्यावर सर्व वाहनांसाठी टोल आकारण्यात येणार आहे. या कामाची ‘वर्क आर्डर’ दिल्यानंतर तीन वर्षाच्या कालावधीत हे काम पूर्ण करणे बंधनकारक आहे. असे प्रज्ञा वाळके यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
कदमवाकवस्ती व लोणी काळभोर हे दोन्ही गावे पुणे शहराच्या जवळ आहेत. त्यामुळे येथील नागरीकरणासह विकासाचा वेग प्रचंड वाढला आहे. या दोन्ही गावाची लोकसंख्या सुमारे दीड लाखांहून अधिक आहे. येथील विद्यार्थी, नोकरदार व नागरिक दररोज पुण्याला कामासाठी जातात. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना, नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सेवेसाठी मेट्रो हा एक ऊत्तम पर्याय आहे. हडपसर ते लोणी काळभोरपर्यंत मेट्रोचा प्रकल्प झाल्यास हडपसरसह 15 नंबर, मांजरी, शेवाळवाडी, फुरसुंगी, कदमवाकवस्ती व लोणी काळभोर या सात गावांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे.
हडपसर ते लोणी काळभोर असे ११. ५ किलोमीटर पर्यंत मेट्रो धावणार आहे. असा निर्णय पुणे एकिकृत महानगर परिवहन प्राधिकरण (पुम्टा) च्या बैठकीत घेण्यात आला होता. या प्रस्तावास पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने व मुख्यसभेने मान्यता दिली आहे. मात्र मागील काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या बैठकीत लोणी काळभोर पर्यंतच्या होणाऱ्या मेट्रोचा कोणताही विषय घेण्यात आला नसल्याची माहिती समोर येत आहे.
त्यामुळे हडपसर ते यवत दरम्यान पुढील तीन वर्षात सहा पदरी उड्डाणपूल झाला तर लोणी काळभोर पर्यंत मेट्रो कोठून आणि कशी नेणार? याबाबतचा कोणताही निर्णय प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे लोणी काळभोर पर्यंत मेट्रो होणार की नाही? हा निर्णय अद्यापही गुलदस्त्याचत आहे.