राजकीय नेत्यांमध्ये पुन्हा पेटापेटी! मंत्री महाजनांच्या मालमत्तेची यादी खडसे मुख्यमंत्र्यांना देणार…

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे याच पार्श्वभूमीवर आता ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्यातील राजकीय युद्ध चांगलेच पेटले आहे. दोघांमधील शत्रुत्व दिवसेंदिवस वाढत असून, एकमेकांना शह देण्याची संधी दोन्हीही नेते सोडत नाहीत.
आता पुन्हा या दोघांमध्ये जुंपली असून, एकमेकांची उणीधुणी काढत आहेत. मी मोठ्या जमीनदाराचा मुलगा असून, माझ्याकडे वडिलोपार्जित भरपूर शेती आहे. त्यांचे वडील साधे शिक्षक असताना ते इतके मोठे कसे झाले, असा प्रश्न करत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांना डिवचले होते.
त्यावर महाजनांनी जोरदार पलटवार केला. संपूर्ण राज्याला माहिती आहे, की कोण तुरुंगात गेले तसेच कोण चो-या करत आहे. तसेच दिल्लीला जाऊन कोणी माफी मागून लोटांगण घातले, अशा शब्दांत महाजनांनी खडसेंना सुनावलं. यावर खडसे पुन्हा आक्रमक झाले असून, त्यांनी महाजनांना पुन्हा डिवचले आहे.
खडसे यांनी मला लोटांगण घालण्याची आवश्यकता नाही, तुमच्या वरिष्ठांशी आजही माझे चांगले संबंध आहेत. माझ्या घरात केंद्रीय मंत्री आहे, मला लोटांगण घालण्याची काय गरज? असा टोला महाजनांना लगावला आहे. गिरीश महाजन यांनी कमावलेल्या कोट्यवधींच्या मालमत्तेची यादी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देणार आहे, असा सूचक इशारा खडसेंनी दिला.
दरम्यान, मी कुठल्याही मुरूम चोरीचा प्रकार केला नाही, महाजन यांचीच प्रवृत्ती खोटे गुन्हे दाखल करण्याची आहे. ‘ईडी’चाही खोटा गुन्हा दाखल करण्याचे काम केले. माझे राजकीय करिअर संपवण्यासाठी हे कुणी केले, कसा गुन्हा दाखल केला, हे सर्वांना माहिती आहे. गिरीश महाजन हे मूळ मुद्यावरून मागे फिरतायत, महामार्गाच्या जमिनीच्या मोबदल्यात मी जमीन आता घेतलेली नाही. माझ्या वडिलोपार्जित जमिनी आहेत, असा दावा देखील एकनाथ खडसेंनी केला आहे.
मी महाजनांना १०० एकरचे उतारे देखील दाखवतो. त्या उलट यांचे वडील शिक्षक असताना हजारो कोटींची मालमत्ता तुमच्याकडे आली कशी? ठिकठिकाणी मालमत्ता तुम्ही कशा घेता? मी दिल्लीला जाऊन कधीही लोटांगण घातलेला नाही, मी लोटांगण घातलं असतं तर माझ्यावरील ईडी कधीच निघून गेली असती. माझ्या कुटुंबाचे वाटोळे करण्याचे काम या लोकांनी केले. महाजनांच्या प्रॉपर्टीची चौकशी अँटी करप्शनमार्फत करावी, अशी मागणी देखील एकनाथ खडसेंनी केली.