आता ढेकळाचे पंचनामे करायचे का? कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य, नेमकं काय घडलं?

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने हाहाकार उडवला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असताना राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आता ढेकळाचे पंचनामे करायचे का? असं वक्तव्य त्यांनी केले आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

रोहित पवार म्हणाले, नेहमी वादग्रस्त विधानं करणारे मंत्री हे राज्याचे कृषिमंत्री आहेत की शेतकऱ्यांचे शत्रू आहेत, हेच समजत नाही. पावसामुळं झालेल्या नुकसानीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याऐवजी ढेकळाचे पंचनामे करायचे का? असं संतप्त विधान करुन अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम हे कृषिमंत्री महाशय करत आहेत.
राज्यभरात मे महिन्यात झालेल्या पावसाने ४० हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून सर्वाधिक फटका हा कांदा, फळबाग आणि भाजीपाला पिकांना बसला. कृषिमंत्र्यांच्या नाशिक जिल्ह्यातच तब्बल ७ हजार हेक्टरपर्यंत नुकसान झालं असून हे कृषिमंत्र्यांनी बांधावर जाऊन बघावं, असेही ते म्हणाले.

तसेच नुकसानीचे पंचनामे करताना जुने निकष काही असले तरी पावसामुळं नुकसान झालं असेल तर त्याची भरपाई शेतकऱ्यांना द्यायची नाही का? अजितदादा आपणच यामध्ये लक्ष घालण्याची आणि कायमच वादग्रस्त बोलणाऱ्या या मंत्र्याला संवेदनशीलतेने बोलण्याचा धडा देण्याची गरज आहे. असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे मंत्री झाल्यापासून सतत वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. यामुळे ते अनेकदा वादात सापडले आहेत. यावर त्यांनी राजीनामा देण्याची मागणी देखील झाली आहे. यामुळे इथून पुढे तरी हे अशी वक्तव्य टाळणार का? हे येणाऱ्या काळातच समजेल.