‘लग्नाला गेलो ती चूक असेल तर मला फासावर लटकवा’, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया..

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पक्षातील नेते राजेंद्र हगवणे यांच्या सून वैष्णवी हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. आता राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे अजितदादांच्या गटाच्या नेत्याची वैष्णवी ही सून होती. तसेच अजितदादाही या लग्नाला हजर होते. या सर्व प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणाशी माझा दुरान्वये संबंध नाही, असं अजित पवार यांनी सांगितले. या प्रकरणात आपली उगाच बदनामी केली जात आहे. कुणाच्या लग्नाला जाणं ही माझी चूक आहे का? उगाच बदनामी करताय. माझी चूक असेल तर फासावर लटकवा, अशा शब्दात अजित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
या प्रकरणासंदर्भात ते लवकरच स्वतंत्र पत्रकार परिषद घेणार आहेत. वैष्णवी ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. या प्रकरणी वैष्णवीच्या कुटुंबीयांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. हगवणे कुटुंबाला अजित पवार यांच्याकडून पाठिंबा मिळत असल्याचा दावा कस्पटे कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर या प्रकरणावर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणावर सहाव्या दिवशी पहिली प्रतिक्रिया दिली. ‘मी यासंदर्भात सविस्तर पत्रकार परिषद घेऊन बोलणार आहे. या प्रकरणाशी माझा संबंध नाही.’ अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी बारामतीमध्ये दिली आहे.
अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. बारामती विमानतळ दाखल होताच पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी या प्रकरणाशी माझा दुरान्वये संबंध नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.