माॅन्सून ५ दिवसांत केरळमध्ये येणार, महाराष्ट्रात कधी? राज्यात कुठे काय अलर्ट?, हवामान विभागाने दिली माहिती..

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात मंगळवारी (ता.२०) मुसळधार पाऊस पडला. ३ मे पासूनच अचानक आभाश भरून आले आणि वीजांचा कडकडाट सुरू झाला. दररोज अवकाळी पावसाचे सरी कोसळत असून, पावसाचा जोर कमी होण्याचे काहीही लक्षण नाही.
अनेक भागात मुसळधार पावसासह वादळ आणि विजांच्या कडकडाटाच्या घटना नोंदल्या गेल्या, ज्यामुळे शहरातील रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम झाला. अशातच आता मोसमी पाऊस पुढील चार ते पाच दिवसांत केरळमध्ये धकडण्याचा अंदाज हवामान विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस वेळेच्या आधीच केरळमध्ये दाखल होईल, असेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार यंदा मान्सूनचे आगमन झाले, तर २००९ सालानंतर भारतीय भूमीवर सर्वात अगोदर दाखल होणारा मान्सून ठरेल.
२००९ साली मान्सूनचे आगमन २३ मे रोजी झाले होते. सामान्यतः केरळमध्ये मान्सूनचे आगमन १ जून रोजी होत असते. परंतु यंदा मान्सूनचा प्रवेश २७ मेपर्यंत होण्याची शक्यता अगोदरच व्यक्त करण्यात आली आहे.
मान्सूनच्या वाटचालीसंदर्भात भारतीय हवामान विभागाने अद्ययावत माहिती दिली आहे. त्यानुसार येत्या चार ते पाच दिवसांत मान्सून केरळमध्ये धडकण्याचा अंदाज आहे. मान्सूनच्या आगमनासाठी केरळमध्ये पोषक स्थिती निर्माण होत असल्याचे हवामान विभागाने म्हटले.
दरम्यान, सामान्यतः मान्सूनचे १ जूनपर्यंत केरळमध्ये आगमन होते. पुढे ८ जूनपर्यंत मान्सूनकडून देश व्यापला जातो. नंतर १७ सप्टेंबरच्या जवळपास राजस्थानच्या मार्गाने त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो आणि तो १५ ऑक्टोबरपर्यंत संपुष्टात येतो. तर २००९ सालानंतर यंदा प्रथमच मान्सून चार दिवस अगोदर केरळमध्ये धडकण्याचे भाकित हवामान विभागाने अगोदरच व्यक्त केले आहे.
हवामान खात्याने २१ ते २४ मे दरम्यान महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. याचे कारण अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य भागात कर्नाटक किनाऱ्याजवळ तयार झालेली चक्रवाती अभिसरण प्रणाली असल्याचे सांगितले जात आहे.