गुंड गजा मारणेला मटण पार्टी करून देणं पडलं महागात, बड्या अधिकाऱ्यांसह ४ पोलीस कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई..

पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याने सांगली कारागृहात घेऊन जाताना पोलिसांच्या समक्ष ढाब्यावर मटण पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. आरोपी असूनही ढाब्यावर जेवण देणं आणि बेजबाबदारपणे वागणुकीमुळे पुणे पोलिसांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
त्याला ढाब्यावर भेटणाऱ्या सराइतासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सुरज राजगुरु यासह हवालदार महेश बामगुडे, हवालदार सचिन मेमाणे, हवालदार रमेश मेमाणे, पोलिस शिपाई राहुल परदेशी यांना निलंबित करण्यात आलं आहे.
मोक्का कारवाई अंतर्गत गजा मारणे पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याला सांगली तुरूंगात पाठवलं होतं, त्यावेळी ढाब्यावर मटण पार्टी झाली होती. पोलिसांना माहिती मिळताच बेजबाबदारपणे वागणुकीमुळे आता कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना कुख्यात गुंड मारणेच्या मटण पार्टीची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.
दरम्यान, कसून चौकशीअंती दोषी आढळलेल्या एका सहायक निरीक्षकासह एकूण सहा कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याचे कठोर आदेश त्यांनी जारी केले. इतकेच नव्हे, तर मारणेला त्या ढाब्यावर भेटलेल्या त्याच्या साथीदारांवरही गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया पोलिसांनी युद्धपातळीवर सुरू केली आहे.