पुढील ४८ तास अतिमहत्वाचे!! ‘या’ ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होणार, अलर्ट जारी…

पुणे : राज्याच्या काही जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाने तडाखा दिला आहे. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाचे सावट कायम आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पाऊस आणि गारपिटीचा अनुभव नागरिकांनी घेतला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील ४८ तास अतिशय महत्त्वाचे ठरणार असून, राज्यातील विविध भागांमध्ये ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसास पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि विदर्भात यलो अलर्ट आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर या भागात ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
सकाळचे काही तास वगळता दिवसभर अंशतः ढगाळ हवामान राहणार असून, वादळी पावसामुळे वाहतुकीत अडथळे येण्याची शक्यता आहे. नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच पुणे, सातारा या भागांमध्येही अचानक वादळी पावसाचा धोका असल्यामुळे स्थानिक प्रशासन सज्ज ठेवण्यात आले आहे. या हवामान बदलामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचेही वृत्त आहे.
मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात गारपिटीमुळे डाळिंब, द्राक्ष, कांदा आणि भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे. नाशिक, औरंगाबाद, बीड, परभणी या जिल्ह्यांमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी करण्यात येत आहे. अवकाळी पावसामुळे आतापर्यंत राज्यात ४ मृत्यू झाले असून, अनेक जनावरांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
हवामान विभागानुसार अंदमान-निकोबार बेटांवर मान्सूनचे आगमन सुरू झालं असून, यानंतर पुढील काही दिवसांत तो महाराष्ट्राच्या दिशेने सरकेल. ६ जूनच्या सुमारास मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.