थरारक अनुभवानंतर माणुसकीचा हात! आदिलभाईंनी घरी नेलं आणि..; काश्मीरमध्ये अडकलेल्या रुपाली ठोंबरेंच्या डोळ्यात पाणी, नेमकं काय घडलं?

पहलगाम : येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांचे यामध्ये जीव गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. आता याठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना एक हृदयस्पर्शी अनुभव आला आहे. याबाबत त्यांनी माहिती दिली आहे.
त्यांना स्थानिक मुस्लिम ड्रायव्हर आदिलभाईंनी मदतीचा हात दिला, त्यांनी जे दाखवून दिलं ते म्हणजे धर्म नाही, माणुसकी महत्वाची आहे. रुपाली ठोंबरे यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये त्या म्हणाल्या, आदिलभाईंनी आम्हाला घरी नेलं, जेवायला घातलं आणि सुरक्षित एका हॉटेलमध्ये पोहोचवलं.
या प्रसंगी त्यांचं माणुसकीचं मोठेपण पाहून माझ्या डोळ्यांत अश्रू आले. असेही त्यांनी म्हटले आहे. आपण दहशतवाद्यांवर कारवाई कराच, पण पर्यटकांना तातडीने विमानाने घरी पोहोचवण्याची सोय करावी. अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. याठिकाणी अनेक लहान मुले आमच्यासोबत आहेत, आणि परिस्थिती अत्यंत बिकट आहे.
तसेच आदिलभाईंनी म्हटलं, ही माणुसकीची हत्या आहे. काही जण चुकीचं कृत्य करतात आणि आमच्यासारखे अनेक लोक बदनाम होतात. हे दु:ख शब्दांत मांडता येणार नाही. याबाबत सुषमा अंधारे यांनी म्हटले की, हिंदू संकटात असताना काश्मिरी मुस्लिम मदतीला धावून आले. हे दहशतवाद्यांनो, बघा माणुसकी अजूनही जिवंत आहे.
त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधत म्हटलं की, हा हल्ला धर्मावर नाही, तर भारताच्या सार्वभौमत्वावर आहे. दरम्यान, या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद संपला असं वाटत होतं, त्यामुळे पर्यटकांची संख्या नंदनवनाकडे जाण्यासाठी वाढू लागली होती. पहलगाम येथे झालेल्या हल्लाने देशभरात खळबळ उडाली आहे.