उरुळीकांचन रेल्वे स्थानकावर मेगा रेल्वे टर्मिनलसाठी सर्व्हेक्षण सुरू! जमीन संपादनाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविणार…

उरुळीकांचन : पुणे रेल्वे विभागातून सुटणाऱ्या गाड्यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी आणि पर्यायी टर्मिनलच्या उभारणीसाठी ‘उरळीकांचन ‘ येथे भव्य कोचिंग टर्मिनल उभारण्याचा निर्णय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केल्यानंतर या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी रेल्वे प्रशासनाकडून जमीनीच्या सर्व्हेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे.
देशभरातील सर्वात मोठा पुणे विभागातील रेल्वे टर्मिनल हा उरळी रेल्वे स्थानकावर उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. नुकत्याच या स्थानकाला अमृत भारत योजनेचे १३ कोटी रुपये मंजूर झाले आहे. मात्र टर्मिनल उभे करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून जागेचे सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे.त्यानुसार टर्मिनलसाठी आवश्यक जागांची मोजणी करून, तो अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे रेल्वे विभागातून दररोज दोनशेपेक्षा जास्त गाड्या धावत आहे. त्यापैकी ६५ ते ७० रेल्वे गाड्या पुण्यातून सुटतात. पुण्यातून सुटणाऱ्या गाड्यांची देखभाल दुरुस्ती ही पुण्यातच करावी लागते. सध्या घोरपडी कोचिंग व मेन्टेनन्स कॉम्प्लेक्स येथे गाड्यांची देखभाल दुरुस्ती केली जाते. या ठिकाणी ‘पीट लाइन’, ‘स्टेबलिंग लाइन’ आणि ‘कोचिंग कॉम्प्लेक्स’ आहेत. पुणे विभागातून सुटणाऱ्या गाड्यांची ‘पीट लाइन’वर देखभाल दुरुस्ती केली जाते; तसेच आवश्यक ते ‘स्पेअर पार्ट’ बदलले जातात. पुणे स्थानकावर आल्यानंतर सुटण्यासाठी उशीर असलेल्या गाड्या प्लॅटफॉर्मवर उभ्या राहून, तो गुंतून राहतो. त्यामुळे अशा गाड्या ‘स्टेबलिंग लाइन’वर उभ्या केल्या जात आहेत.
त्यामुळे या लाईनवर सर्व सेवा सुरू ठेवणे अतिशय कठिण बाब ठरत असल्याने पुणे शेजारील उरुळीकांचन रेल्वे स्थानकावर टर्मिनल उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या घोषणेनंतर तात्काळ भूसंपादन करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यानुसार जागेचे सर्व्हेक्षण सुरू झाले आहे. सर्व्हेक्षणानंतर हा अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे उरुळीकांचन येथे लवकर पुणे रेल्वे विभागाचे मेगा कोचिंग टर्मिनल व भव्य स्थानक साकारण्यात येणार आहे.
उरळी मेगा टर्मिनलसाठी आवश्यक असलेल्या जागेसाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या टर्मिनलसाठी किती जागा लागणार आहे, हे समजणार आहे. त्यानंतर आवश्यक जागेच्या भूसंपादनाचा प्रस्ताव पाठविण्यात येईल.
– डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे