पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर हल्ला, गावच्या जत्रेतच केलं लक्ष्य, नेमकं घडलं काय?

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धाराशिव येथे भूम तालुक्यामधील आंदरूड गावात यात्रेच्या कुस्तीच्या फडामध्ये एका पैलवानाने निलेश घायवळ याच्यावर हल्ला केला. पैलवानाने त्याच्या कानाखाली मारल्याचं दिसून आले आहे.
हा हल्ला दुसरा तिसरा कुणी नव्हे तर एका पहिलवानानेच केल्याची माहिती समोर आली आहे. कुस्तीच्या फडात अशाप्रकारे कुख्यात गुंडावर हल्ला झाल्याने घटनास्थळी खळबळ उडाली आहे. हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील घायवळ टोळीचा म्होरक्या आणि कुख्यात गुंड निलेश घायवळ हा धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंदरूड गावात जत्रेनिमित्त आला होता. येथील ग्राम दैवत जगदंबा देवीच्या यात्रे निमित्ताने गावात कुस्तीचा फड भरवला होता.
दरम्यान, याठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी राज्य भरातून मल्ल उपस्थितीत होते. दरम्यान, प्रसिध्द कुस्तीपटू थापाच्या कुस्तीच्या वेळी निलेश घायवळ याच्यावर हल्ला करण्यात आला. जेव्हा हल्ला झाला, तेव्हा निलेश घायवळ आणि आयोजक हे आखाड्यात पहिलवान यांची भेट घेत होते.
तसेच प्रसिद्ध कुस्तीपटू थापाची कुस्ती सुरू असल्याने कुस्तीच्या मैदानाजवळ कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा घेत, अचानक निलेश घायवळवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. हल्ला करणारा दुसरा तिसरा कुणी नसून अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावचा पहिलवान असल्याची माहिती समोर आली आहे.