पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन घेऊन आले अन् भर रस्त्यात पती पत्नीवर गोळीबार, घटनेने सोलापूर हादरलं…

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी चार वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून पती-पत्नीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना येवती- रोपळे मार्गावर घडली. शिवाजी जाधव आणि सुरेखा जाधव अशी गोळीबारात जखमी झालेल्या पती पत्नीची नावे आहेत.
सोलापूर पोलिसांनी संशयित आरोपीच्या शोधासाठी पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक रवाना केले आहे. गोळीबार करून दशरथ केराप्पा गायकवाड हा संशयित फरार झाला आहे. दोघांना उपचारासाठी पंढरपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून सुरेखा जाधव यांची प्रकृती चिंताजनक आहे. गोळीबाराची घटना घडल्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलीस दल अलर्ट झाले आहे.
शिवाजी जाधव व सुरेखा जाधव हे पती-पत्नी एकादशी निमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते. ते दर्शन आटोपून येवतीकडे येत असताना येवती- रोपळे रस्त्यावर ते आले असता दशरथ गायकवाड याने त्या पती-पत्नीवर गोळ्या झाडल्या. त्यात ते दोघेही जखमी झाले आहेत. नंतर आरोपी पळून गेला.
घटनेनंतर घटना स्थळाला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी भेट देऊन पोलीस निरीक्षक शेंडगे यांना तपासा बाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी अधिक माहिती दिली.
संशयीत आरोपी दशरथ केरु गायकवाड (वय 25 वर्षे,रा,येवती ता मोहोळ,जि सोलापूर) याने आता तुम्हाला माझा हिसका दाखवतो, असे सांगत गोळीबार केला. गोळीबार होताच येवती रोपळे रस्त्यावर जागोजागी जिवंत काडतुसे आणि दोन मॅक्झिन पोलिसांना मिळाल्या आहेत. याबाबत पोलीस तपास करत आहेत.