ब्रह्माकुमारीजच्या मुख्य प्रशासक दादी रतन मोहिनी यांचे निधन, वयाच्या १०१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..

जयपूर : ब्रह्मकुमारीज इन्स्टिट्यूट (आबू रोड) च्या मुख्य प्रशासक दादी रतन मोहिनी यांचे सोमवारी रात्री १.२० वाजता अहमदाबाद (गुजरात) येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्या १०१ वर्षांच्या होत्या.
संस्थेच्या प्रवक्त्याने सांगितले की, ब्रह्माकुमारींच्या प्रमुख १०१ वर्षीय राजयोगिनी दादी रतनमोहिनी आता या जगात नाहीत. त्यांनी सोमवारी रात्री उशिरा अहमदाबादमधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
प्रवक्त्यांनी सांगितले की, त्यांचे अंतिम संस्कार १० एप्रिल रोजी सकाळी केले जातील. ४ वर्षांपूर्वी दादी हृदय मोहिनी यांच्या निधनानंतर, दादी रतनमोहिनी संस्थेच्या मुख्य प्रशासक बनल्या. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी राजयोगिनी दादी रतनमोहिनी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
दादींचा जन्म २५ मार्च १९२५ रोजी हैदराबाद, सिंध (सध्याचे पाकिस्तान) येथे झाला. त्यांचे नाव लक्ष्मी होते. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी त्या ब्रह्माकुमारी संस्थेच्या संपर्कात आल्या. लहानपणापासूनच अध्यात्मात रस असलेल्या दादींनी संस्थेच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली.
दादी रतन मोहिनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत सक्रिय राहिल्या. ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी त्या दररोज पहाटे ३.३० वाजता उठायच्या आणि रात्री १० वाजेपर्यंत सेवेत मग्न असायच्या. भारतीय संस्कृती आणि मूल्यांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अनेक पदयात्रा केल्या. १९८५ मध्ये त्यांनी १३ यात्रा केल्या आणि २००६ मध्ये त्यांनी ३१ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. एकूण ७० हजार किलोमीटरहून अधिक चालल्या.