ट्रम्प वर्ल्ड सेंटर! डोनाल्ड ट्रम्प पुण्यात उभारणार भारतातील पहिले कमर्शियल ऑफिस, जागाही ठरली..

पुणे : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही निर्णयामुळे व्यापार युद्धाची शक्यता आणि त्याचा जगातील शेअर बाजारावर होणारा परिणाम यामुळे अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते सतत चर्चेत आहेत. युक्रेन युद्ध असो की इस्रायल पॅलेस्टाइन प्रश्नाबाबत ट्रम्प यांच्या भूमिकेवरून जगभरात अस्वस्थता आहे.
असे असताना ट्रम्प यांच्या नावाची चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. याचे कारणही पुढे आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने भारतात पहिल्यांदाच एक कमर्शियल ऑफिस उभारले जात आहे. हे ऑफिस पुण्यातील कोरेगाव पार्कजवळ उभारले जाणार आहे. यामुळे याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
ट्रम्प ब्रँडच्या नावाने देशात अनेक रेसिडेंशियल प्रॉपर्टीज आधीपासून उपलब्ध आहेत. परंतु कमर्शियल प्रॉपर्टी मात्र नव्हती. आता ‘ ट्रम्प वर्ल्ड सेंटर’च्या माध्यमातून अशी प्रॉपर्टी तयार होणार आहे.यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले असून यामध्ये करोडो रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.
हा प्रकल्प पुणे शहराच्या वाढत्या व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. आधुनिक डिझाइन, जागतिक दर्जाचे ऑफिस स्पेस उपलब्ध उच्चस्तरीय सुविधा देणारा हा प्रकल्प पुण्याला एक नवीन ओळख मिळवून देईल. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी हे एक प्रमुख आकर्षण ठरू शकते. यामुळे येणाऱ्या काळात हा प्रकल्प सुरु होणार आहे.
ट्रम्प ऑर्गनायझेशनचे भारतातील भागीदार ट्रिबेका डेव्हलपर्सचे कल्पेश मेहता यांनी बुधवारी या प्रकल्पाची अधिकृत घोषणा केली. हा प्रकल्प पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम कंपनी कुंदन स्पेसेस यांच्यासोबत विकसित केला जाणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत दोन उच्चस्तरीय व्यावसायिक टॉवर्स उभारले जातील, असेही त्यांनी सांगितले.
कंपनीला या प्रकल्पामधून सुमारे 289 मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 2400 कोटी रुपये इतक्या महसुलाची अपेक्षा आहे. यामुळे तशा सुविधा देखील निर्माण केल्या जाणार आहेत. येणाऱ्या काळात याबाबत काम सुरु होणार असून याबाबत माहिती देखील पुढे येईल.