सासू सासऱ्यांनी गाठला क्रूरतेचा कळस, आधी सुनेला केली मारहाण अन् मग…,घटनेने नागपूर हादरले

नागपूर : सासू- सासऱ्यांनी सुनेचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नागपूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जयताळा मार्गावर असलेल्या अष्टविनायकनगरमध्ये ही घटना घडली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी सासू – सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रीती चिव्हाणे (वय. ३५ वर्षे) असं जखमी महिलेचं नाव आहे. तर भानुदास चिव्हाणे (वय – ६५वर्षे) आणि माया चिव्हाणे (वय -६३ वर्षे) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहे.
सविस्तर माहिती अशी की, प्रीती ही मिहानमधील टीसीएस कंपनीत काम करते. तिचा नवरा वैद्यकीय उपकरणांच्या पुरवठ्याचं काम करतो. प्रीत आणि स्वप्नील आधी शेजारीज राहायचे त्यांचा प्रेमविवाह झाला आहे.
दरम्यान एक वर्षाआधी प्रीतीला स्वप्नीलचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती मिळाली. तिने याविषयी तिच्या भावाला आणि नातेवाईकांना सांगितलं. नातेवाईकांनी स्वप्नीलला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याने ऐकलं नाही. गेल्या एक वर्षापासून चिव्हाणे कुटुंबीय प्रीतीचा शारिरीक आणि मानसिक छळ करत होते. प्रीतीने १ मार्चला तिच्या सासू – सासऱ्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली.
तिने पोलिसांकडे तक्रार केल्यामुळे माया आणि भानुदास यांना संताप अनावर झाला. त्यांनी १० मार्चला साधारणपणे ८.४५ च्या सुमारास प्रीती कामावरुन घरी आल्यावर शिवीगाळ करायला सुरुवात केली. प्रीतीने सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती पहिल्या मजल्यावरच्या बेडरुममध्ये जायला निघाली. त्यावेळी माया आणि भानुदास यांनी प्रीतीचा हात पकडला आणि तिला वायरने शॉक दिला.
शॉक लागल्यानंतर प्रीती घाबरली. तिने स्वतःची सुटका करुन घेतली आणि ती खोलीत गेली.त्यानंतर दोघांनी तिचे केस पकडले आणि तिला पायऱ्यांवरुन ओढून खाली आणलं. तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. प्रीतीने आरडाओरडा केल्याने शेजारचे लोक आणि नातेवाईक तिथे आले. त्यांनी तिला खासगी हॉस्पिटलमध्ये तिला दाखल केलं. पोलिसांनी या प्रकरणात सासू -सासऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे