तरुणाची विवस्त्र करून गरम सळईने हत्या!! सोलापूरमधील भयंकर घटनेने राज्यात खळबळ..

सोलापूर : राज्यात बीड येथील धक्कादायक घटनेची बातमी ताजी असताना आता सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे एका 28 वर्षीय युवकाची अमानुष हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
या खूनामुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ माजली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींना कडक शिक्षा मिळावी अशी स्थानिकांची अपेक्षा आहे. मृतकाचे नाव आकाश अंकुश खुर्द असून, त्याचा मृतदेह 11 मार्च रोजी सकाळी पिलीव-माळशिरस रोडवरील फॉरेस्ट परिसरात सापडला.
आकाशचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत होता आणि त्यावर गरम सळईने चटके दिल्याचे आढळले. यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत माहिती अशी की, आकाश 10 मार्च रोजी रात्री 11:30 वाजता घराच्या बाहेर गेला होता. त्याला अज्ञात व्यक्तीने फोन करून भेटायला बोलावले होते.
आकाश त्याच्या आईला दहा मिनिटांत परत येण्याचे सांगून घराबाहेर पडला, पण तो परत आला नाही. त्याच्या कुटुंबीयांना तेव्हापासून त्याचा शोध घेत असताना त्याचा मृतदेह सापडला. यामुळे मोठा घातपात झाल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक मडावी यांनीही घटनास्थळी भेट दिली.
या हत्येच्या संदर्भात पोलिसांनी प्रेमसंबंध किंवा अनैतिक संबंधांचा शक्यताद्वारे तपास सुरु केला आहे. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.