उरुळीकांचन’ ला कोंडीची खिंड जमीनदोस्त करण्यास सुरुवात! अनधिकृत पथकाने मुख्य चौक मोकळे करुन टाकले; कारवाई सुरू राहणार असल्याचे पथकाकडून संकेत….!

उरुळीकांचन : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या उरुळीकांचन (ता.हवेली) येथील मुख्य तळवाडी चौक व एलाईट चौक तसेच सर्व्हिस रस्त्यावरील ‘एनएचएआय ‘ हद्दीतील अनधिकृत बांधकामे जिल्हा प्रशासनाच्या संयुक्तिक पथकाने काढली आहे. महामार्गावर ३० मीटर अंतरावर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने रस्त्याने मात्र मोकळा श्वास घेतला आहे.
पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक कोंडीची खिंड म्हणून उरुळीकांचन येथील तळवाडी चौक तेएलाईट हॉटेल चौक प्रसिद्ध आहे. या ठिकाणी अरुंद रस्ता व अतिक्रमणांनी मुख्य रस्त्याचा भाग अनेक वर्षे कोंडला आहे. या महामार्गावर बांधकामे, पत्राशेड, टपऱ्या , गाळे काढून महामार्गालगत बांधकामे अनेक वर्षापासून केली गेली आहे. अगदी व्यावसायिक बांधकामे थेट रस्त्यावर आल्याने अरुंद रस्त्यापायी वाहतुक समस्या सोडविणे अतिशय कठिण बाब ठरु लागल्याने कारवाई पथकाने सोमवारी (दि.९) उरुळीकांचन हद्दीत चौधरीमाथा वस्तीपासून केलेल्या कारवाईने रस्त्याने मुक्तीचा श्वास सोडला आहे. महामार्गावरून एनएचएआय हद्दीत येणाऱ्या मध्यभागापासून ३० मीटर पर्यंत ही कारवाई केली आहे.
तर उर्वरीत कारवाई महामार्ग कंट्रोल म्हणून ‘पीएमआरडीए’ आणखी ६ मीटर करुन करणार आहे. सोमवारी सकाळपासून कारवाई चे संयुक्त पथक उरुळीकांचन हद्दीत प्रवेश करुन अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारत होते. चौधरी माथा ते गाडीतळ व शिंदवणे रस्त्यावरील अतिक्रमणे काढली आहे. पथकाने जेसीबी पोलिसांच्या फौजफाट्यात ही कारवाई करण्यात आली आहे. उर्वरीत महात्मा गांधी रस्ता, आश्रम रस्ता तसेच खेडेकर मळा वस्तीपर्यंत कारवाई होणार आहे. त्यानंतर पुढील पंधरा दिवसांत पीएमआरडीए बांधकाम धारकांना नोटिसा देऊन उर्वरीत ६ मीटर दोन्ही बाजूंस अतिक्रमण हटविणार असल्याचे पथकाने स्पष्ट केले आहे.
या कारवाईला पीएमआरडीए बांधकाम अभियंते गणेश जाधव, प्रतिम चव्हाण, एनएचएआय चे शाखा अभियंता रोहन जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे लवटे तसेच पोलिस निरीक्षक शंकर पाटिल आदींचा कारवाईत सहभाग होता.