जेजुरी देवस्थानचा मोठा निर्णय! आता ‘ती’ कपडे घातली तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही, जाणून घ्या…

पुणे : जेजुरीच्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी आजपासून वस्त्र संहिता लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. यामुळे याकडे सर्व भक्तांचे लक्ष लागले आहे. ट्रस्टकडून नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. अचानक असा निर्णय घेतल्याने याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
आता मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असणार आहे. भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असा निर्णय श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. हा नियम केवळ जेजुरीतील खंडोबा देवस्थानसाठी लागू असणार आहे.
वेस्टर्न कपडे परिधान करुन भाविकांना जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेता येणार नाही. यामध्ये फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट असा व तत्सम कपडे घालून देव दर्शनास गडावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. गुडघ्याच्या वरती असणारे किंवा आखूड-कमी कपडे ट्रस्टला अपेक्षित नाहीत.
यामुळे हे कपडे न घालण्याचं नम्र आवाहन सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे. महिला आणि पुरुष दोघांसाठी हे नियम लागू आहेत. दर्शनासाठी येताना भाविकांनी कोणत्याही प्रकारची भारतीय पारंपरिक वेशभूषा लागू असेल.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जेजुरीला देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी आजपासूनच हे नियम पाळायचे आहेत. जेजुरीचे खंडेराया हे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत असून आराध्य दैवत आहेत. दरवर्षी येथे बारामाही देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी असते.