महिला वर्ग उन्हाळ्यात कसं जपाल आरोग्य


उरुळी कांचन : उन्हाळा हा आरोग्यासाठी फार त्रासदायक असतो. छोट्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वानाच याचा त्रास होतो. महिलावर्ग देखील यात भरडला जातो. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याला जपण्यासाठी काही खास टिप्स.

खूप पाणी प्या :

दररोज कमीतकमी ८ ग्लास तरी
पाणी प्या. भरपूर प्रमाणात पाणी पिण्याने तुम्हाला अनेक आजारांपासून मुक्ती मिळेल. तुमच्या शरीरास अनावश्यक असलेले, विषारी असलेले घटक पाण्यामुळे नाहीसे होण्यास मदत मिळेल. त्याचबरोबर तुमच्या त्वचेवरदेखील चमक येईल. सौंदर्यप्रसाधनांना टाकून द्या आणि हा नैसर्गिक व सोपा उपाय आजमावून बघा.
योग करा आजार पळवा :
योग हे एक असं साधन आहे, ज्यामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतात. शरीर लवचीक होतंच शिवाय तुम्हाला ताजतवानंही वाटतं.
दोन घास कमी खा :
अनेक लोकांना अगदी पोट पूर्ण भरेपर्यंत जेवण्याची सवय असते. पण उन्हाळ्याच्या दिवसात मात्र दोन घास कमीच खा. कारण पोट गच्च भरेपर्यंत खाण्याने तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळण्याऐवजी तुमचा ऊर्जेचा स्तर कमी होतो. तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा भाज्या व फळे भरपूर प्रमाणात खा.
दिवसाची सुरुवात न्याहारीने करा
रात्रभर झोपल्यानंतर उठून एक आरोग्यदायी न्याहारी तुमच्या रिकाम्या झालेल्या पोटासाठी अत्यंत उपयुक्त ठरतेच. शिवाय त्यामुळे तुम्हाला दिवसभराच्या कामासाठी ऊर्जाही मिळते. न्याहारीत भरपूर प्रथिनांचा समावेश असावा व कमीतकमी फॅटसचा समावेश असेल, याची काळजी मात्र नक्की घ्या.
व्यायामाची जादू
व्यायाम करणं हा एक उत्तम अनुभव आहे. वॉर्मअपने व्यायामाची सुरुवात करा. यामुळे तुमच्या मांसपेशी ताणल्या जातात. त्यानंतर एक दीर्घ श्वास घ्या. मग व्यायाम करा व शरीराला ताण देणाऱ्या व्यायामाने, व्यायामाचा शेवट करा.