महाराष्ट्र केसरीचे युद्ध पुन्हा रंगणार!! दोघांना मिळणार २५-२५ लाखांचं बक्षीस, जाणून घ्या कुस्तीचे ठिकाण…
पुणे : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. नुकत्याच पार पडलेली महाराष्ट्र केसरी २०२५ ची स्पर्धा वादग्रस्त ठरली होती. अंतिम आणि उपांत्य सामन्यामध्ये झालेल्या राड्यानंतर शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली होती.
पहिल्यांदाच घडलेल्या या घटनेने याची मोठी चर्चा झाली. शिवराज आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये झालेल्या कुस्तीवेळी शिवराजची पाठ न टेकताच त्याला पराभूत घोषित केल्याचा आरोप केला गेलो. यावेळी शिवराज राक्षे याने पंचांना लाथ मारली होती.
नंतर अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाड याने १६ सेकंद बाकी असताना सामना सोडला होता. या घटनेमुळे दोघांवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. मात्र आता पुन्हा शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये कुस्ती होणार आहे
याबाबत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दोघांमध्ये कुस्ती घेणार असल्याचे जाहीर केले आहे. ही कुस्ती सांगली शहरामध्ये लावून दोघांना २५-२५ लाख देऊन त्यांचा योग्य तो सन्मान लावून जनतेच्या मनतील संभ्रम दूर होईल, असेही चंद्रहार पाटील यांनी सांगितले आहे.
दरम्यान, पृथ्वीराज मोहोळ हाच महाराष्ट्र केसरी असून त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. मात्र जो काही वाद झालेला आहे तो सांगलीत येऊन थांबवण्याची तयारी आम्ही केली आहे. यासाठी ही कुस्ती आयोजित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
याबाबत पृथ्वीराज मोहोळ याने कुस्तीची तयारी दाखवली आहे. आता शिवराज राक्षे याची वेळ घेत ही कुस्ती घेणार आहोत. ही कुस्ती सांगली शहरामधील तरुण भारत या स्टेडियमध्ये होणार आहे. यामुळे याकडे सर्व कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे.