Datta Jayanti 2024 : श्री दत्त जयंतीचा मोठा उत्साह, विद्युत रोषणाई, फुलांच्या सजावटीने मंदिरे सजली…

Datta Jayanti 2024 : विद्युतरोषणाई, फुलांची आकर्षक सजावट आणि धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांनी आज शनिवारी (ता.१४) डिसेंबर शहरातील मंदिरांमध्ये श्री दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. सायंकाळी मंदिरांमध्ये प्रथेप्रमाणे श्री दत्त जन्मसोहळा आयोजित केला असून, मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी दिवसभर खुली राहणार आहेत.
तसेच, श्री दत्त गुरूंच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमणार आहे. यानिमित्ताने भाविकांना प्रसादाचाही लाभ घेता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री दत्त जयंतीनिमित्त मंदिरांमध्ये वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले आहे.
अभिषेक, महापूजा, आरती, दत्तयाग यांसह भजन-कीर्तन, प्रवचन, व्याख्याने आदी कार्यक्रम होणार आहेत. मंदिरांमधील श्री दत्त जयंती उत्सवाची सांगताही बुधवारी वैविध्यपूर्ण कार्यक्रमाने होईल. मध्यवर्ती पेठांसह विविध ठिकाणच्या मंदिरांमध्ये जय्यत तयारी केली आहे.
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे १२७ व्या दत्त जयंती सोहळ्यांतर्गत श्री दत्त जयंतीनिमित्त शनिवारी (ता.१४) सकाळी सहापासून मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. शनिवारी सकाळी सहा वाजता लघुरुद्र, त्यानंतर श्री दत्तयाग होईल. सकाळी आठ वाजता प्रात: आरती तसेच दुपारी साडेबारा वाजता माध्यान्ह आरती होईल. Datta Jayanti 2024
दत्त जन्मसोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात कीर्तनकार तेजस्विनी कुलकर्णी यांचे श्री दत्तजन्म कीर्तन सायंकाळी पाच वाजता असून, सायंकाळी ५ वाजून ५७ मिनिटांनी श्री दत्त जन्मसोहळा पार पडेल.
त्यानंतर सायंकाळी ७ वाजता सायंकाळी आरती होईल. त्यानंतर पालखीची नगरप्रदक्षिणा आयोजित केली आहे. या वेळी सुवर्ण रथातून पारंपरिक दिंडी, अश्व बग्गी, नगारावादन आणि वाद्य पथकांच्या जल्लोषात भाविकांसह निघणार आहे.