Maharashtra Politics : फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला! जाणून घ्या कधी घेणार आमदार मंत्रीपदाचीस शपथ…

Maharashtra Politics : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आणि आमदारांनी शपथग्रहण केल्यानंतर आता सगळ्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या गोटातून एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. येत्या १४ तारखेला महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन अवघ्या पाच दिवसांवर आले असल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी रात्री शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा केली. नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या काही मंत्र्यांचा शपथविधी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत या तिन्ही नेत्यांची एकवाक्यता असली तरी खातेवाटपांवरून वाद आहेत. Maharashtra Politics
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजूनही गृह खात्यासाठी आग्रही असले तरी गृह खाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याचे शिंदे यांना स्पष्ट सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता नगरविकास खात्यासाठी शिंदे आग्रही आहेत. गेली पाच वर्षे शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. मात्र, या खात्याच्या कारभारावरून मुंबईतील अनेक विकासकांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रारी केलेल्या आहेत.

दरम्यान, १४ डिसेंबरला विस्तार झाला नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवार हे तिघेच हिवाळी अधिवेशन चालवतील. आणि विस्तार जानेवारीत केला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.