Ajit Pawar : अजित पवारांना मोठा दिलासा! आयकर विभागाने जप्त केलेली मालमत्ता केली मुक्त, नेमकं प्रकरण काय?

Ajit Pawar : राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी नव्या सरकारचा पायगुण चांगलाच फलदायी ठरला आहे. आयकर विभागाने २०२१ मध्ये अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांची जप्त केलेल्या १००० कोटींच्या मालमत्तेवरील टाच उठवण्याचा निर्णय घेतला आहे.

आयकर विभागाने जप्त केलेली त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची मालमत्ता आता मुक्त करण्यात आली आहे. दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने या प्रकरणात निर्णय देत जप्त केलेली मालमत्ता मुक्त केली आहे, ज्यामुळे पवार कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
आयकर विभागाने काही महिन्यांपूर्वी अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या मालमत्तेवर कारवाई केली होती. विशेषतः अजित पवार यांच्या स्पार्कलिंग सॉईल, गुरु कमोडिटी, फायर पॉवर ॲग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी संबंधित मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. Ajit Pawar

या कारवाई विरोधात पवार कुटुंबाने कोर्टात याचिका दाखल केली होती. २०२३ मध्ये झालेल्या या कारवाईसाठी पवार कुटुंबाने मालमत्ता जप्त करण्यात आलेली असल्याने स्थगितीची मागणी केली होती, ज्यावर कोर्टाने अंतिम निर्णय दिला.
दरम्यान, 5 डिसेंबर रोजी अजित पवारांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी त्यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला. कोर्टाच्या निर्णयानंतर अजित पवार यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा थंडावा मिळाला असून, जप्त मालमत्तेची मुक्तता झाली आहे. ज्यामुळे पवार कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.