Kolhapur News : कप केकने घेतला जीव, विषबाधेमुळे सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू, बालकाचा दफन केलेला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी काढला बाहेर..

Kolhapur News : नातेवाईकांनी आणलेला कप केक खाल्ल्याने बहीण भावाचा मृत्यू झाल्याची मन सुन्न करणारी घटना घडली आहे. नातेवाईकांनी आणलेल्या कप केकमधून विषबाधा झाल्याने दोन्ही बहीण- भावंडांची प्रकृती बिघडली.

त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. श्रीयांश आंगज (वय. ५) आणि काव्या आंगज (वय.८) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.
चिमगावमधील रणजित आंगज यांचा मुलगा श्रीयांश व मुलगी काव्या यांना नातेवाइकांनी आणलेल्या केकमधून विषबाधा झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. सोमवारी (ता.२ ) मुलांना पोटात दुखून उलट्या सुरू झाल्याने प्रथमोपचार करण्यात आले होते; पण त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. Kolhapur News

मंगळवारी सकाळी श्रीयांशचा मृत्यू झाला. दरम्यान, गंभीर असलेल्या काव्याला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तिचा उपचार सुरू असताना सायंकाळी मृत्यू झाला. या दोन्ही मुलांच्या मृत्यूने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

दफनभूमीतून मृतदेह काढला बाहेर…
कप केकमधून विषबाधा होऊन मृत्यू झालेल्या श्रीयांश आंगज (वय.४) याचा मृतदेह बुधवारी उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांनी दफनभूमीतून बाहेर काढला. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप पावडे, सहायक आयुक्त यू. एस. लोहकरे, अन्नसुरक्षा अधिकारी आर. पी. पाटील यांच्यासह पथकाने ज्या दुकानातून नातेवाईकांनी केक खरेदी केला तेथे तपासणी केली. तसेच आंगज कुटुंबीयांच्या घरी जाऊन खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले. हे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार आहेत.
मुरगूड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी भुमरे व त्यांच्या पथकाने श्रीयांशच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी जागेवरच केली. यावेळी पोलिस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी करे, तहसीलदार अमरदीप वाकडे, कृषी सहायक अधिकारी संगीता शिंदे, तलाठी स्मिता शारबिद्रे, पोलिसपाटील किरण भाट, ग्रामसेवक बी. के. साठे, सरपंच दीपक आंगज व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील लोकांनी मोठी गर्दी केली होती.