विठ्ठल मंदिर सजलं, कार्तिकी एकादशी दिवशी हे कुटूंब ठरलं महापूजेचे मानकरी, मंदिरात विशेष फुलांची सजावट…


पुणे : कार्तिकी एकादशी निमित्त आज विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार सोबत त्यांच्या पत्नी सायली पुलकुंडवार देखील होत्या.

राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू असून त्यामुळे आज कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा पुणे विभागाचे महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली.

यावेळी लातूर जिल्ह्यातील उमरगा येथील भाविक दाम्पत्य बाबुराव सगर आणि सागरबाई सगर या मानाच्या वारकरी दाम्पत्याला शासकीय पूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला आहे.

दरवर्षी प्रथेप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री हे कार्तिकीची शासकीय महापूजा करत असतात. मात्र, सध्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यानं प्रशासनानं पुण्याचे महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते ही महापूजा संपन्न झाली.

विठुरायाच्या महापूजेसाठी मानाचे वारकरी ठरले ते म्हणजे सगर कुटुंबीय. सगर कुटुंबीय हे गेली १४ वर्षांपासून पंढरीची वारी करत आहेत. गवंडीकाम करून ते आपला चरितार्थ चालवतात. आज कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त पहाटे सुरुवातीला होणारी देवाची नित्यपूजा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तर देवाची पाद्यपूजा व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते पार पडली. यानंतर पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची षोडशोपचारे महापूजा करण्यात आली आहे.

पांडुरंगाच्या कृपेनंच आपल्याला ही महापूजा करण्याचे भाग्य लाभलंय, योगायोगाने आचारसंहिता सुरू असल्यानं शासनाचा आदेश मिळाला आणि हा महापूजा करण्याचा मान मिळाल्याचं डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रातील तमाम जनतेचं आयुष्य सुखकर होवो, त्यांना चांगलं आरोग्य लाभो, आनंदमयी जीवन होवो, असं साकडं विठुरायाला घातल्याचं त्यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!