Vanraj Andekar : पुण्यातील वनराज आंदेकर हत्या प्रकरणी अजून एका आरोपीला अटक, महत्वाची माहिती आली समोर…
Vanraj Andekar : कौटुंबिक वाद, संपत्ती, तसेच वैमनस्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार, तसेच कोयत्याने वार करण्यात आले. आंदेकर यांच्यावर कोयत्याने तब्बल २४ वार करण्यात आले.
पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्यांपैकी एक गोळी नाकावर आणि दुसरी गोळी कंठात शिरल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी याआधी काही जणांना अटक केल्यानंतर काल आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
संगम संपत वाघमारे असे काल अटक करण्यात आलेल्या २० वर्षीय आरोपीचे नाव असून त्यानेच आंदेकर यांच्या हत्येसाठी शस्त्रे पुरवल्याची माहिती आहे.
वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणी यापूर्वीच १५ हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात संगम वाघमारे याने आरोपींना शस्त्रे पुरवल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती.
त्यानंतर आता संगम वाघमारे या अल्पवयीन आरोपीलाही पोलिसांकडून अटक करण्यात आली. संगमला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
वनराज आंदेकर यांचा खून कौटुंबिक, संपत्ती, तसेच वर्चस्वाच्या वादातून झाल्याचा संशय आहे. त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे. आंदेकर यांचा रविवारी रात्री (ता. १) नाना पेठेतील डोके तालीम परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून, तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला. Vanraj Andekar
प्राथमिक तपासात बहीण संजीवनी, तिचा पती जयंत, दीर गणेश, प्रकाश यांच्याशी आंदेकर यांचे वाद झाले होते. कौटुंबिक वादातून खून झाल्याची माहिती मिळाली. आंदेकरांच्या सांगण्यावरून दुकानावर अतिक्रमण कारवाई झाल्याच्या रागातून कोमकर यांनी खुनाचा कट रचला आणि आंदेकर टोळीतून फुटलेल्या सोमनाथ गायकवाडची मदत घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
गायकवाडचा साथीदार निखिल आखाडे, त्याचा मित्र शुभम दहिभाते यांच्यावर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यांत नाना पेठेत हल्ला करण्यात आला होता. कोयता, स्कू-ड्रायव्हरने त्यांच्यावर वार करण्यात आले होते. हल्ल्यात आखाडे याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला होता.
दरम्यान, आखाडेचा खुनाचा बदला घेण्याचा तयारीत सोमनाथ होता. संजीवनी, प्रकाश, गणेश, जयंत यांच्याशी संगनमत करून सोमनाथने आंदेकरांच्या खुनाचा कट रचल्याची माहिती तपासात मिळाली आहे. या प्रकरणी पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.