Gadchiroli : काळजावर वार… दोन्ही मुलांचा एकाच वेळी मृत्यू, तब्बल १५ किलोमीटर आई आणि बापाने दोन मृत मुलं कडेवर घेऊन केली पायपीट..

Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. दोन सख्ख्या चिमुकल्या भावंडांचा तापाच्या आजाराने मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आई-वडिलांना तब्बल १५ किलोमीटर या मुलांचे शव घेऊन पायपीट करावी लागली.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील पत्तीगाव या गावची ही घटना. पोरं अचानक तापाने फणफणली. एक सहा वर्षाचा आणि एक तीन वर्षाचा मुलगा आजाराने कण्हत असताना त्याला डॉक्टरांऐवजी पुजाऱ्याकडे नेले आणि व्हायचे तेच झाले.
दरम्यान, एक दोन तासाच्या अंतरात दोघांचाही मृत्यू झाला. पण त्याच्या पुढची घटना अशी की, या दोघांचे मृतदेह घेऊन त्यांच्या आई बापांना तब्बल १५ किलोमीटर चालत जावे लागले. Gadchiroli
बाजीराव रमेश वेलादी (६ वर्षे) व दिनेश रमेश वेलादी (३ वर्षे, दोघे रा. येर्रागड्डा ता. अहेरी) अशी या दोन चिमुकल्यांची नावे आहेत. दोघेही येरागड्डा या गावचे, परंतु चार दिवसापूर्वी आई-वडिलांबरोबर ते पत्तीगाव या त्यांच्या आजोळी आले होते.
नेमकं घडलं काय?
बुधवार (ता. ४) रोजी सकाळी थोरल्या बाजीरावला ताप आला. त्याच्यानंतर काही वेळातच धाकटा दिनेशलाही ताप आला. याच गावातील एका पुजाऱ्याकडे आई-वडिलांनी दोघांना नेले. तेथे पुजाऱ्याने जडीबुटी खायला दिली. मात्र अवघ्या काही वेळातच सकाळी साडेदहा वाजता बाजीरावचा आणि त्यानंतर बाराच्या सुमारास दिनेशचा मृत्यू झाला.
दोघेही मरण पावल्याने आई-वडिलांनी आकांत केला, पण तरीदेखील कदाचित ते वाचू शकतात अशा अपेक्षेने त्यांनी धावत पळत पाण्यातून, चिखलातून वाट काढत दोघांना खांद्यावर घेऊन जीमेलगट्टा आरोग्य केंद्रात नेले.
मात्र तेथील डॉक्टरांनी दोघेही मृत झाल्याचे सांगितल्यावर आई-बाबांनी आकांत केला. या आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नव्हती, त्यामुळे देचलीपेठ या गावावरून रुग्णवाहिका बोलवण्याची डॉक्टरांनी तयारी दाखवली. मात्र रमेश वेलादी व त्यांच्या बायकोने पत्तीगाव या गावाकडे रुग्णवाहिका जाणार नसल्याने ही मदत नाकारली आणि पुन्हा दोघांना खांद्यावर घेऊन पत्तीगावाकडे निघाले. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.