आता शिवरायांच्या पुतळ्याचा चबुतरा बांधणारा कोल्हापूरातील कंत्राटदारही फरार, पोलिसांकडून तपास सुरू…

कोल्हापूर : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा तीन दिवसांपूर्वी पडला. यामुळे तमाम शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.
राजकोट येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर पुतळ्याचे काम करणार्यांचा शोध सुरू झाला. त्यामध्ये कोल्हापूर कनेक्शन पुढे आल्यानंतर डॉ. चेतन एस. पाटील याचे नाव एका रात्रीत चर्चेत आले.
शिवाजी पेठेमध्ये राहूनदेखील शेजार्यांशी संपर्क नसणारा डॉ. पाटील ही घटना घडल्याच्या दिवशी घराला कुलूप लावून फरार झाला आहे. डॉ. चेतन पाटील मूळचा कोल्हापूरचा असून, त्याने आपले अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो कोल्हापुरातील एका खासगी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.
बांधकाम सल्लागार म्हणून तो काम करत होता. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये त्याने पीएच.डी. केली आहे. अनेक प्रकल्पांचे त्याने सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालमीजवळ राहणार्या डॉ. पाटील याची पत्नी डॉक्टर असून, त्या खासगी प्रॅक्टिस करतात. पाटील दाम्पत्याला एक मुलगा असून, तो दहावीमध्ये शिकत आहे. परंतु, हे कुटुंब नेहमीच शेजार्यांपासून अलिप्त राहिले असल्यामुळे, शेजार्यांनादेखील त्यांच्याबद्दल फारसे माहीत नाही.
मालवण राजकोट येथील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी बांधकाम सल्लागार डॉ. चेतन एस. पाटील याच्यावर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, शासनाची फसवणूक आदी गंभीर कलमे लावत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीम परिसरात डॉ. पाटील राहत असून, मंगळवारी मालवण पोलिस जुना राजवाडा पोलिसांच्या मदतीने घरी पोहोचले. त्याच्या कुटुंबीयांची चौकशी केली, तेव्हा डॉ. पाटील घरी नव्हता. त्याच्या घराला कुलूप असल्याने ते माघारी फिरले.