मोठी बातमी : पूरपरिस्थितीने रद्द झालेल्या दहावी, बारावीच्या पुरवणी पेपर परिक्षा या दिवशी ! राज्य मंडळाचा विद्यार्थ्यांना दिलासा…
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फ जुलै ऑगस्ट महिन्यात घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षा सध्या सुरू आहेत. मात्र, राज्यभरात विविध ठिकाणी अतिवृष्टी होत असल्याने 26 जुलै रोजी नियोजित करण्यात आलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
पावसामुळे एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना राज्य मंडळातर्फे देण्यात आल्या आहेत. इयत्ता दहावीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन या विषयाची परीक्षा 26 जुलै रोजी सकाळी 11 ते 1 या कालावधीत नियोजित करण्यात आली होती. परंतु अतिवृष्टीमुळे परीक्षेचे वेळापत्रक बदलले आहे. आता या विषयाची परीक्षा 31 जुलै रोजी सकाळी 11 ते 1 या कालावधीत घेतली जाणार आहे.
राज्य मंडळातर्फे इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा घेतली जात असून 26 जुलै रोजी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, अर्थशास्त्र व तंत्रज्ञान, एमसीव्हीसी पेपर दोन या विषयांची परीक्षा नियोजित करण्यात आली होती. परंतु पावसामुळे आता या सर्व विषयांची परीक्षा 9 ऑगस्ट रोजी घेतली जाणार आहे. त्याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.