Loni Kalbhor : लोणी काळभोर येथील होर्डिंग्ज प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई! गुलमोहर लॉन्सच्या मालकासह दोन ठेकेदारांवर…
Loni Kalbhor : पुणे-सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ असलेल्या गुलमोहर लॉन्स येथे शनिवारी (ता.१८) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याप्रकणी आता जागामालक व होर्डिंग उभारणाऱ्या दोन ठेकेदारांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. तर एका घोड्याला ही गंभीर मार लागला आहे.
मंगेश लक्ष्मण लोंढे (वय.३५ गंजपेठ, गुरुवारपेठ पुणे), अक्षय सुरेश कोरवी (वय.२०, अप्पर डेपो विबवेवाडी पुणे) व भारत शंकर साबळे (वय. ७०, ताडोवाला रोड बंडगार्डन पुणे) अशी या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची नावे आहेत.
तर याप्रकरणी पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे (वय. २९, रा.लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुलमोहर लॉन्सचे मालक शरद ज्ञानेश्वर कामठे, (जागामालक, रा. लोणी काळभोर, ता. हवेली), सम्राट ग्रुपचे संजय संभाजी नवले (रा. खराडी पुणे) व बाळासाहेब बबन शिंदे (रा. डेक्कन, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Loni Kalbhor
सविस्तर माहिती अशी की, शरद कामठे यांची कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीत गट क्र. ९१४ मध्ये स्वत:च्या मालकीची जागा आहे. हि जागा पुणे सोलापूर महामार्गालगत व पुणे शहरापासून अगदी जवळ असल्याने, कामठे यांनी या ठिकाणी गुलमोहर लॉन्स या नावाने विवाह कार्यालय बांधले आहे.
तसेच गुलमोहोर लॉन्स समोरील पार्कींग जवळ अंदाजे ४० बाय ४० फुट लांबी-रुंदीचे जाहीरातीसाठी लोखंडी सांगाड्याचे होर्डिंग्ज उभारले आहे. आणि हे होर्डिंग्ज उभारण्याचे व जाहिराती बदलण्याचे काम सम्राट ग्रुपचे संजय नवले व बाळासाहेब शिंदे यांना देण्यात आले होते.
दरम्यान, गुलमोहर लॉन्स येथे शनिवारी एक विवाह सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी पुण्यातील एका वाद्य पथकाला सुपारी देण्यात आली होती. या सोहळ्यात वाद्य वाजविण्यासाठी पथक येथे आले होते. यावेळी गुलमोहरच्या समोरील अंगणात वाजंत्री बसले होते. तेथेच एका झाडाखाली घोडा गाडी बांधण्यात आली होती.
शनिवारी (ता.18) दुपारी साडे चार वाजण्याचा सुमारास अवकाळी पाऊस व वादळी वारा सुरु झाला. या पावसात हे धोकादायकरीत्या बांधण्यात आलेले महाकाय होर्डिंग कोसळले. या होर्डिंगखाली वाजंत्री मंगेश लोंढे, अक्षय कोरवी व भारत साबळे असे तिघेजण सापडले. अडकलेल्या तिघांनाही नागरिकांनी तत्काळ बाहेर काढले व उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.
तिघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत पांढरा घोडाही किरकोळ जखमी झाला आहे. तर पिकअप व ज्युपीटर या दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, गोपनीय हवालदार रामदास मेमाणे, अंमलदार अजिंक्य जोजारे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हे होर्डिंग्ज सक्षम प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेता, स्ट्रक्चरल ऑडीट न करता व कमकुवत लोखंडी सांगाडा रचून नागरीकांचे जिवीतास धोका निर्माण होईल असे बांधण्यात आल्याचे समोर आले.
दरम्यान, याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुलमोहर लॉन्सचे मालक दोन ठेकेदारांवर शरद कामठे, ठेकेदार संजय नवले व बाळासाहेब शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे करीत आहेत.