Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन, सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात..

Pandharpur News : गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर काम सुरू आहे. आता विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. महिनाअखेर काम पूर्ण होईल, यामुळे मंदिर लवकरच खुले करण्यात येणार आहे.
यामुळे आता विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची विठ्ठलभक्तांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. पुढील महिन्यापासून म्हणजे जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत माहिती देण्यात आली आहे. जूनपासून विठुरायाचे पदस्पर्श सुरू होईल, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
याठिकाणी राज्य सरकारने सुमारे ७४ कोटी रुपयांचा मंदिर विकास आराखडा मंजूर केला आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिराला मूळ रूप देण्यासाठी काम हाती घेण्यात आले होते. पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली १५ मार्चपासून हे काम सुरू आहे.
दरम्यान, मंदिराचे काम सुरू असल्याने भाविकांसाठी विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद आहे. पहाटे सहा ते सकाळी अकरा वाजेपर्यंत मुखदर्शन सुरू आहे. यामुळे ते कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सहकाऱ्याने मंदिराच्या कामासाठी निधी मिळाला आहे.
राज्य सरकारच्या सहकार्यामुळेच भव्य, देखणे विठ्ठल मंदिर लवकरच खुले होणार आहे, अशी माहिती मंदिर समितीने दिली. आता संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज यांच्यासह अनेक पालख्या देखील पुढील महिन्यात निघणार आहेत. यामुळे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाणार आहे.