पंतप्रधान मोदी जाहिरातीत प्रत्येक गोष्टीची गॅरंटी देतात, परंतु शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव देण्याची गॅरंटी देऊ शकत नाही हे देशाचं दुर्दैव – खासदार डॉ. अमोल कोल्हे

घोडेगाव : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज सोमवार (दि. १) रोजी गावभेट दौरा केला. या दौऱ्यात शेतकऱ्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी बिबट्याचे हल्ले, कांदा, सोयाबीन, दुधाच्या बाजारभवाबद्दल संसदेत आवाज उठवल्याबद्दल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे आभार मानले. अनेक जेष्ठ महिलांनी पुन्हा संसदेत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, गावभेट दौरा सुरू असताना गंगापूर बुद्रुक ( ता. आंबेगाव) या गावातील एका शेतात कांद्याची काढणी सुरू असताना थेट शेतात जाऊन डॉ. कोल्हे यांनी कांद्याचा बाजारभाव आणि एकूण परिस्थिती बाबत आढावा घेतला.
मजूर महिला, कांदा उत्पादक शेतकरी यांनी डॉ. कोल्हे यांच्याशी बोलताना केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली, याशिवाय राज्य सरकारच्या दूध उत्पादक शेतकरी यांच्यात असलेल्या नाराजीचा पाढा शेतकऱ्यांनी वाचला.
यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारवर टीका केली ते म्हणाले की, “अगोदर ४०% कांदा निर्यात शुल्क निर्णय लादला त्यातच जपानवरून घाईघाईने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून कांदा आम्ही खरेदी करणार म्हणून सांगितलं आणि कांद्याचे भाव पाडले, किलोमागे कांदा उत्पादक शेतकर्यांचे ३० रुपये नुकसान होत आहे. शेतकऱ्याच्या आशेवर पाणी फिरवण्याचे काम मोदी सरकारने केलं आहे. पंतप्रधान प्रत्येक गोष्टीची गॅरंटी देतात परंतु शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव देण्याची गॅरंटी देऊ शकत नाही हे दुर्दैव आहे. अशी टिका त्यांनी केली आहे.