Uruli Kanchan : सिमेंट पोत्यांची चोरी केल्याप्रकरणी तिघे ताब्यात, उरुळी कांचन पोलिसांची कारवाई…

uruli kanchan उरुळी कांचन : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील जानाई डेव्हलपर्स या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेतून २० पोती सिमेंट घेऊन जाणाऱ्या तिघांना उरुळी कांचन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी एक टेम्पो व २० सिमेंटची पोती असा २ लाख ७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी सौदागर अभिमान बदर (वय ३१, रा. प्रयागधाम फाटा, कोरेगाव मुळ, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रशांत जांलिदर भोइटे (वय. २६), रत्नाकर लक्ष्मण शिंदे (वय ३६, रा. दोघेही सोरतापवाडी, ता. हवेली), व दीपक बाबुराव रनवरे (वय. ३६ रा. उरुळी कांचन, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या जानाई डेव्हलपर्स या ठिकाणी रिकामी जागा आहे. रविवारी (ता.२४) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास प्रशांत भोइटे, रत्नाकर शिंदे व दिपक रनवरे या तिघांनी संगनमत करून या रिकाम्या जागेत बिर्ला सिमेंट या कंपनीची सिमेंटची पोती चोरण्याची योजना केली होती. Uruli Kanchan
सिमेंटची पोती ही एका टेम्पोत भरून घेऊन जात असताना सौदागर बदर यांना जागीच मिळून आले. यावेळी बदर दिसताच आरोपी हे त्या ठिकाणावरून पळून गेले. याप्रकरणी बदर यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
या घटनेच्या अनुषंगाने उरुळी कांचन पोलिसांनी या तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीत वापरलेला २ लाख रुपयांचा टेम्पो व ७ हजार ६०० रुपयांची सिमेंटची पोती असा २ लाख ७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रमोद गायकवाड करीत आहेत.