Maharashtra Board Exam : बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळणार १० मिनिटांचा जास्त वेळ! वाचा नवीन नियम…
Maharashtra Board Exam : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. या परिक्षांच्या निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे अधिक वेळ मुलांना पेपर सोडवण्यासाठी दिला जाणार आहे. यामुळे मुलांना फायदा होणार आहे.
बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते २३ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे. तर, दहावीची लेखी परीक्षा १ मार्च २०२४ ते२६ मार्च २०२४ या कालवधीत होणार आहे. मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दहावी बारावी बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून दिली जाणार आहे.
परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत पालक, विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दिली जाणार आहेत. Maharashtra Board ExamMaharashtra Board Exam
या परीक्षा या सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात घेतल्या जाणार आहेत. सकाळच्या सत्रात ११ वाजता पेपर सुरू होणार असल्याने मुलांना १०.३० वाजता दालनात हजर राहावे लागणार आहे. तर दुपारी ३ वाजता पेपर सुरू होणार असल्याने २.३० वाजता वर्गात येवून मुलांना बसावे लागणार आहे.
सकाळच्या सत्रातील पेपर लिखाणाला ११ वाजता सुरुवात होणार आहे. हा पेपर २ पर्यंत सोडवावा लागणार आहे. यानंतर मुलांना २.१० असा वाढीव १० मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. तर दुपारी ३ वाजता पेपर लिखाणाला सुरुवात होणार आहे.
दरम्यान, फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणार आहे.