Shreyas Talpade : वैद्यकीयदृष्ट्या माझा मृत्यू झाला होता!! श्रेयस तळपदे याने सांगितला धक्कादायक अनुभव..

Shreyas Talpade : गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यानंतर तातडीने त्याला अंधेरीतल्या बेलेव्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली. जवळपास सहा-सात दिवसांनंतर श्रेयसला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.
यानंतर प्रथमच श्रेयसने हृदयविकाराचा झटका आल्यानंतर नेमकं काय घडलं याचा विचलीत करणारा अनुभव शेअर केला आहे. मी मृत्यू अगदी जवळून अनुभवला आहे. मात्र, मी यातून वाचलो यासाठी मी स्वत:ला खूपच भाग्यशाली समजतो.
मी खूप आभारी आहे. वैद्यकीयदृष्ट्या माझा मृत्यू झाला होता. मला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. हा माझ्यासाठी एक वेक-अप कॉल होता ज्याने मला आयुष्य जगण्याची दुसरी संधी दिली आहे. Shreyas Talpade
मी माझ्या आयुष्यात याआधी कधीच रुग्णालयात दाखल झालो नव्हतो. कधीच कोणतं फ्रॅक्चरसुद्धा झालं नव्हतं. त्यामुळे असं काही होईल याची मी कल्पनासुद्धा केली नव्हती. तुमच्या आरोग्याला अजिबात गृहित धरू नका. जान है तो जहान है, असं त्याने म्हटलंय. असे अनुभव तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलतात, असा तो म्हणाला.
ज्या दिवशी हार्ट अटॅक आला, तेव्हा नेमके काय घडले याविषयी सांगताना तो पुढे म्हणाला, आम्ही मुंबईत ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटासाठी शूटिंग करत होतो. आर्मी ट्रेनिंगचा सीक्वेन्स होता आणि त्यामुळे पाण्यात पडणे, दोरीवरून उड्या मारणे असे सर्वकाही करत होतो. पण अचानक शेवटच्या शॉटनंतर मला श्वास घेताना खूप त्रास जाणवला.
माझा डावा हात प्रचंड दुखू लागला होता. मी माझ्या व्हॅनिटी वॅनपर्यंत कसाबसा गेलो आणि कपडे बदलले. ॲक्शन सीन्सचे शूटिंग केल्याने असं काही होत असावं असे मला वाटलेहोते. कारमध्ये बसल्यानंतर मी थेट रुग्णालयात जाण्याचा विचार केला. पण नंतर वाटलं की नाही, आधी घरी जावं. माझ्या पत्नीने मला त्या स्थितीत पाहिलं आणि पुढच्या दहा मिनिटांत तिने रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला.
आम्हाला रुग्णालयाचा गेट दिसत होता, पण एण्ट्रीजवळ बॅरिकेट लावल्याने यु-टर्न घ्यावा लागला. त्याच क्षणी माझा चेहरा सुन्न झाला आणि मी बेशुद्ध झालो. तो कार्डिॲक अरेस्ट होता.
माझं हृदय काही मिनिटांसाठी धडधडणं बंद झालं होतं. आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो, त्यामुळे दिप्ती तिच्या कारमधून बाहेर पडू शकत नव्हती. त्यावेळी काही लोकांनी मदत केली आणि आम्हाला रुग्णालयात पोहोचवलं. डॉक्टरांनी मला तातडीने सीपीआर, इलेक्ट्रिक शॉक दिला.
त्यादिवशी जणू जीवदान मिळाल्याचा अनुभव आल्याचं श्रेयसने सांगितलं क्लिनिकली, मी मृतावस्थेत होतो. कारण तेवढ्या तीव्रतेचा तो कार्डिॲक अरेस्ट होता. हा माझ्यासाठी वेक-अप कॉल होता असंच मी म्हणेन. आयुष्याने मला ही दुसरी संधी दिली आहे.
माझं आयुष्य वाचविण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, त्यांचा मी किती ऋणी आहे हे मी शब्दांत मांडू शकत नाही. अर्थात माझी सुपरवुमन पत्नीसुद्धा, तिने मला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न केले होते”, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.