Old Pension Scheme : मोठी बातमी! राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी आजपासून संपावर, काय आहेत मागण्या?

Old Pension Scheme : सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आक्रमक झाले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करावी, सरकारी कार्यालयांमधील रिक्त जागा भराव्यात यासह विविध मागण्यांसाठी विविध सरकारी विभागांमधील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे.
गुरुवार (ता. १४)पासून या संपाला सुरुवात होत असून, सरकारी कामकाज ठप्प होण्याची चिन्हे आहेत. या बेमुदत संपाच्या हाकेमुळे शासकीय कामे प्रलंबित राहण्याची धास्ती नागरिकांत दिसून आली.
मुदत संपात नाशिकसह राज्यभरातील १७ लाख कर्मचारी, तसेच शिक्षकही सहभागी होणार आहेत.यामुळे सर्वसामान्यांची कामे खोळंबण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मार्च २०२३ मध्ये संपावर गेले होते. त्यावेळी सरकारने यावर विचार करण्यासाठी माजी सनदी अधिकारी सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने राज्य सरकारला अहवाल देखील दिला होता. Old Pension Scheme
समितीने अहवाल देऊनही राज्य सरकारने याबाबत निर्णय न घेतल्यामुळे सरकारी कर्मचारी नाराज झाले होते. संघटनांच्या समन्वय समितीने १४ डिसेंबरपासून पुन्हा राज्यव्यापी संप करण्याची घोषणा केली होती. कर्मचाऱ्यांनी १२ डिसेंबर नागपुरात महामोर्चा काढला होता. अशातच आता आजपासून हे कर्मचारी पुन्हा संपावर जाणार आहेत. त्यामुळे सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.