Crime News : पत्नी भांडण करू माहेरी गेली, पतीला आला राग अन्… सासूसोबत केले धक्कादायक कृत्य

Crime News : सासूने मुलीला सासरच्या घरी पाठवण्यास नकार दिल्याने जावयाने खोटे बोलून सासूचे अपहरण करून, घरात कोंडून बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकणी आरोपी आणि त्याच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे.
भावेश मढवी असं आरोपी जावयाचे नाव आहे. तर, सूरज म्हात्रे असे अटक करण्यात आलेल्या साथीदाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी भावेश मढवी हा तळोजाजवळील गावात राहतो. कल्याण पूर्व इथे राहणाऱ्या दीक्षिता खोकरे हिच्याशी त्याचा विवाह झाला होता. त्याला एक मुलगाही आहे.
दीक्षित आणि त्याची पती भावेश यांच्यात कौटुंबिक वादावरून काही महिन्यांपासून भांडण सुरू होते. मारामारीला कंटाळून दीक्षित कल्याण येथील तिच्या आईच्या घरी आली.
भावेश आणि त्याचा मित्र सूरज म्हात्रे दीक्षिताला आणि मुलाला परत घरी घेऊन जाण्यासाठी कल्याण पूर्वेतील अमरदीप कॉलनीत आले. इथे भावेशने रागाने पत्नी कुठे आहे आणि मुलाला कोणाला विकले, अशी विचारणा केली. यावर भावेशच्या सासू-सासऱ्यांनी तू माझ्या मुलीचे वाईट केले आहेस, असे सांगून मुलीला सासरच्या घरी पाठविण्यास नकार दिला.
यावर भावेशने सासू दिपालीला चाकूचा धाक दाखवला. ते म्हणाले की, आम्ही तुम्हाला लगेच पोलीस ठाण्यात घेऊन जाऊ. भावेश आणि सूरजने सासूला पोलिस ठाण्यात नेण्याच्या बहाण्याने जबरदस्तीने गाडीत बसवले आणि तळोजा येथील त्यांच्या घरी नेले. तिथे त्याने सासूला लोखंडी रॉड आणि कात्रीने मारहाण केली.
इकडे दीक्षित आईचा शोध घेत होती. त्यानंतर पती भावेशचा फोन आला की आई त्याच्या ताब्यात आहे. तो म्हणाला की तू मुलाला माझ्या स्वाधीन कर. हा प्रकार दीक्षिताने कुटुंबीयांना सांगितला. मानपाडा पोलिसांसह कुटुंबीय तळोजा इथे पोहोचले. तिथे महिला जखमी अवस्थेत आढळून आली.
पोलिसांनी भावेशच्या ताब्यातून सासू दीपालीची सुटका केली. तसेच पोलिसांनी तात्काळ भावेश आणि सूरजला अटक केली. दोन्ही आरोपींविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.