Pune Crime : नवरा बायकोच्या भांडणात मध्यस्थी करणे पडले महागात, डोक्यात घातला लोखंडी रॉड अन्..

Pune Crime पुणे : नवरा बायकोच्या भांडणामध्ये मध्यस्थी करणार्या तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकी आली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एकाला अटक केली आहे. (Pune Crime)
मुरली जेठुराम निषाद (वय ३३, रा़ केसनंद फाटा, वाघोली) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी नेत्रकुमार परदेस निषाद (वय ३७, रा. केसनंद फाटा, वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या घटनेत तुळशीराम (वय. ४०) हा गंभीर जखमी झाला असून अद्याप बेशुद्ध असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना केसनंदफाटा येथील संत तुकाराम नगरमधील बुरुडे यांच्या बांधकामाच्या ठिकाणी शनिवारी (ता.३०) सकाळी साडेसात वाजता घडली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी व आरोपी हे मुळचे छत्तीसगड येथील राहणारे आहेत. ते बुरुडे यांच्या बांधकामाच्या ठिकाणी बिगारी काम करतात. तेथेच पार्किंगमध्ये राहत आहेत. तुळशीराम हाही तेथेच रहातो.
मुरली निषाद व त्याच्या बायकोमध्ये सकाळी भांडणे सुरु होती. यामध्ये तुळशीराम पडला. याचा मुरली याला राग आल्याने तेथेच पडलेला लोखंडी रॉड घेऊन त्याने तुळशीराम याच्या डोक्यात घातला.
त्यामुळे मोठा रक्तस्त्राव होऊन तुळशीराम हा बेशुद्ध पडला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून मुरली याला अटक केली आहे. तसेच या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजगरु करीत आहेत.