व्यावसायिकाची पुण्यात मोठी फसवणूक, १० रुपयांत हॉटेल रुम बुकींग करताना लाखाला गंडा..

पुणे : पुण्यात १० रुपयांत हॉटेल रुम बुकींग करण्यासाठी एकदा नव्हे तर तब्बल दोनदा ओटीपी शेअर केला आणि दिल्लीतील व्यावसायिकाची लाखांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दिल्लीतील एका ४० वर्षाच्या व्यावसायिकाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे डॉ. डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये दर महिन्याला दोन वेळा व्यवसायानिमित्त येत असतात. यावेळी त्यांचा पाच दिवस पुण्यात मुक्काम होता. नेहमी प्रमाणे ते पिंपरीतील हॉटेल हॉलिडे मध्ये उतरले होते.
परंतु, त्यांना दोन दिवसाकरीता रुम मिळाली होती. त्यामुळे पुढील मुक्कामासाठी कल्याणीनगर येथील हॉटेल रॉयल ऑर्केटच्या वेबसाईटवरील मोबाईल क्रमांकावर रुम बुकिंगबाबत चौकशी केली होती.
दरम्यान यावेळी ते पिंपरीत मिटिंगसाठी हजर असताना त्यांना एक कॉल आला. त्यांनी ट्रु कॉलरवर पाहिल्यावर तो नंबर हा हॉटेल रॉयल ऑर्केट सेंटर रिझर्वेशन असा होता. त्यांना रुमबाबत विचारणा करुन रुम हवी असेल तर क्रेडिट कार्डची माहिती द्यावी लागेल असे सांगितले.
त्यांनी क्रेडिट कार्डचा नंबर शेअर करतो परंतु, मी तुला सीव्हीपी क्रमांक देणार नाही, असे सांगितले. तेव्हा त्याने सीव्हीपी क्रमांकाविना आम्ही रुम बुकिंग देऊ शकत नाही, असे सांगितले. त्यामुळे त्यांनी सीव्हीपी क्रमांक दिला. त्याने रुम बुकिंगसाठी तुमच्या क्रेडिट कार्डमधून १० रुपये क्रेडिट करत आहे. तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो सांगा असे सांगितल्यावर त्यांनी ओटीपी सांगितला.
त्यांना १० रुपये क्रेडिट झाल्याचा मेसेज मिळाला. त्यानंतर त्याने फिर्यादी यांना पुन्हा फोन करुन हॉटेलच्या सिस्टिमध्ये तुमचे १० रुपये क्रेडिट झाल्याचे दाखवत नाही. तुम्हाला दुसरा ओटीपी येईल, तो सांगा, असे म्हटल्यावर फिर्यादी यांनी पुन्हा दुसरा ओटीपी शेअर केला.
त्याबरोबर त्यांच्या खात्यातून ९१ हजार २८५ रुपये ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आला. त्यांनी संबंधिताला फोन केल्यावर तुमची रुम बुक झाली आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, असे सांगून फोन कट केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.