अजित पवारांनी पोलिसांना दिला कानमंत्र, म्हणाले, गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा ‘ते’ काम…


बारामती : पोलिसांच्या कार्यक्षमतेत आणि गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी त्यांना आवश्यक सुविधा देण्यात येत असून पोलिसांनी गुन्ह्यावर नियंत्रण राखण्यासाठी नागरिकांशी संवाद, समन्वय आणि सहकार्य ठेऊन काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. सुपा आणि माळेगाव येथील नवीन पोलीस स्थानाकाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

पुढे अजित पवार म्हणाले, पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देऊन त्यांचा घरांचा, वाहनांचा प्रश्न मार्गी लावण्यात येत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातील वाहनांकरीता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. बारामती शहरासाठी सीसीटिव्ही कॅमेरे मंजूर करण्यात आले आहे. येत्या काळात पोलीस अधीक्षक ग्रामीणच्या नवीन कार्यालयाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

बारामती तालुक्यात सार्वजनिक सण, उत्सव, जयंती व पुण्यतिथी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात साजरे करण्याची परंपरा आहे. सुपा आणि माळेगाव येथील नवीन पोलीस स्थानकांच्या इमारतीमधून पोलिसांनी अतिशय चांगले काम करावे.

या परिसरातील गैरप्रकारांना आळा घालून अवैध धंदे बंद करावे. समाजात पोलिसांचा आदरयुक्त दबदबा असणे गरजेचे असून पोलिसांनीही परिसरात कायदा व सुव्यवस्थेचे वातावरण राखण्यासाठी चांगली कामगिरी करण्यावर भर द्यावा.

तालुक्यात वेगवेगळ्या जाती, धर्माचे लोक राहतात. त्यामुळे एखाद्या विशिष्ट घटकांवर विनाकारण अन्याय होणार नाही याबाबत काळजी घ्यावी. पोलीस स्थानकात येणाऱ्या महिलांच्या अडीअडचणीची योग्य पद्धतीने दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा. नागरिकांनीदेखील कायदा व नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे देखील ते म्हणाले.

यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, आनंद भोईटे, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, पोलीस उप अधीक्षक श्रीकांत पाडुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर, कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, तहसीलदार गणेश शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, माळेगाव न.प.च्या मुख्याधिकारी स्मिता काळे उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!