हडपसरमध्ये पुन्हा मुळशी पॅटर्न! पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न, एकाला अटक तर ७ अल्पवयीन ताब्यात..
पुणे : पूर्ववैमनस्यातून टोळक्याने दोघांवर हल्ला करुन एकावर धारदार शस्त्राने वार करत खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (ता. २४) दुपारी दीड ते पावणे दोनच्या दरम्यान वैदवाडी हडपसर येथील म्हाडा कॉलनीमध्ये घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकाला अटक करुन ७ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
आदित्य राम खैरे (वय. १९ रा. तांबोळी डायस प्लॉट, गुलटेकडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर ७ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मिलिंद मधुकर कांबळे (वय. २३ रा. सर्वे नंबर १०६, म्हाडा कॉलनी, बिल्डींग नंबर 2, रूम नंबर 311, सुरक्षा नगरच्या समोर, वैदवाडी, हडपसर, पुणे) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी मिलिंद कांबळे गुरुवारी (ता.२४) दुपारी त्याचे मित्र विकी हनुमंत गायकवाड व शुभम धर्मराज चाबुकस्वार यांच्यासोबत म्हाडा कॉलनीतील बिल्डींग नंबर २ येथे गप्पा मारत होते. विकी गायकवाड याचे एका अल्पवयीन मुलासोबत भांडण झाले होते.
या भांडणाचा राग मनात धरुन अल्पवयीन मुलगा त्याच्या इतर साथीदारांना घेऊन म्हाडा कॉलनीत आला. या टोळक्याने विकी गायकवाड व फिर्यादी यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने डोक्यात वार करुन गंभीर जखमी केले. तर इतरांनी फिर्यादी यांना लोखंडी रॉडने मारुन जखमी केले.
मिलिंद कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन टोळक्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे तर ७ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कविराज पाटील करीत आहेत.