मोठी बातमी! मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी; 9 प्रवासी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर
मुंबई : येथील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत नऊ प्रवासी जखमी झाले आहेत तर दोन प्रवाशांची प्रकृती ही गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. सकाळी सहा वाजता ही दुर्दैवी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे ते गोरखपूर एक्सप्रेस ही रेल्वे पहाटे 5.10 वाजता सुटते. त्यामुळे दिवाळीला गावी जाण्यासाठी प्रवाशांनी पहाटे 3 वाजल्यापासून रेल्वेमध्ये चढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. याच गर्दीमुळे ही चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. यामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांवर वांद्रेतील भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यापैंकी 9 जणांची प्रकृती स्थिर आहे तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, दिवाळी आणि छट पूजेमुळे बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे वांद्रे ते गोरखपूर रेल्वेतून जाण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली होती. याच गर्दीमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली.