ऐकाकी ८८ वर्षीय बेडरिडन वडीलांना म्हणाला, लंडनला पोहोचलो की फोन करतो ! पायलट सुमित सभरवाल यांची वडीलांना वृध्दपकाळात आधार देण्याची स्वप्ने धुळीत …..


मुंबई : अहमदाबादच्या काल झालेल्या विमान दुर्घटनेत संपूर्ण जगात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.या अपघातात काहींनी संपूर्ण परिवार गमावला तर काहींनी आपलं लोकप्रिय नेतृत्व तर काहींनी आप्तेष्टांना गमावलं आहे. मात्र या अपघातावेळी प्रसंगवधान राखून मोठी दुर्घटना अथवा मनुष्यहाणी होऊ नये म्हणून समयसूचकता दाखवून मोकळी जागा बघून प्लेन क्रॅश करणाऱ्या पायलट सुमित सभरवाल यांच्या संदर्भात त्याचे मित्र यांनी सोशल मीडियावर त्यांची वडील यांच्याबद्दल व्यक्त केलेली वचनबद्धता सोशल मिडियावर मनाला चिर करु लागली आहे.

अपघातात मरण पावलेल्या लोकांच्या करुण कहाण्या एकेक करून समोर येत असताना. त्यातली अत्यंत दुःखद दास्तान पायलट सुमित सभरवाल यांची आहे. ते अविवाहित होते. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्यांचे वडील ८८ वर्षांचे असून ते बेडरिडन आहेत. सुमित आपल्या वडिलांना अधिक वेळ देऊ इच्छित होते. मात्र त्यांची एक्झिट अनेकांना चुटपुट लावून गेली.

एखादा माणूस अकस्मात आजारी पडला वा त्याचा अपघात होऊन त्याची अवस्था गंभीर झाली तर निदान त्याला पाहता येतं. स्पर्श करता येतं. त्याच्याशी एकतर्फी का होईना पण संवाद साधता येतो. तो बोलण्याच्या अवस्थेत असेल तर अखेरचे दोन शब्द बोलू शकतो. व्यक्तीचे देहावसान झाल्यावर त्या दोन शब्दांचा आधार आयुष्यभर साथ देतो.

       

जाणाऱ्यालाही कदाचित काही अंशी समाधान लाभत असेल की, आपल्या अंतिम समयी आपल्या प्रियजनांना पाहू शकलो, स्पर्श करू शकलो, एखादा दुसरा शब्द बोलू शकलो! त्या जिवाची तगमग कणभर का होईना पण कमी होत असेल!

मात्र निरवानिरवीची भाषा न करता, अंतिम विदाईचा निरोप न घेता कुणी कायमचं निघून गेलं तर मागे राहिलेल्या आप्तजनांना विरहाची तळमळ आमरण सोसावी लागते. मोठे वेदनादायी नि क्लेशदायक जगणे वाट्याला येते. काहींच्या बाबतीत काळ, जखमा भरून काढतो तर काहींना त्या वेदनेसह जगावे लागते.

कालच्या विमान अपघातात मरण पावलेले पायलट सुमित सभरवाल येत्या काही महिन्यात ते एअर इंडिया मधली पायलटची नोकरी सोडून आपला सर्व वेळ वडिलांना आणि कुटुंबाला देणार होते. तसे त्यांनी मित्रांना व विमान कंपनीलाही कळवले होते.

काल टेकऑफ करण्याआधी त्यांनी वडिलांना फोन करून सांगितले होते की लंडनला पोहोचताच कॉल करेन.
त्या वृद्ध पित्याला मुलाचा पोहोचल्याचा फोन आला नाही मात्र त्याच्या मृत्यूची बातमी कळली. काय वाटले असेल त्यांना? ते नियतीला नक्की सवाल करत असतील की, ‘मी आजारी असताना मला नेले नाही आणि जो कुटुंबाचा कर्ता होता त्याला नेलेस! असे का केले?’ खरेतर याचे उत्तर कुणापाशीच नाही.
मुलगा कायमचा निघून गेला असला तरीही त्याच्या फोन कॉलची त्यांना कायमच प्रतीक्षा राहील.

काहींनी सेल्फी टाकले. काहींचे विमान चुकले तर कुणी विमानातून उतरले. हे सर्व प्रारब्ध आहे वगैरे म्हणून आपण बाजूला होतो वास्तवात या घटनेची सखोल तांत्रिक चौकशी व्हायला हवी. या विमानातील जवळपास प्रत्येक प्रवाशाची सुमित सभरवाल यांच्यासारखीच दास्तान असेल.

काही दिवसांतच आपण विसरून जाऊ मात्र ज्यांनी आपली आवडती माणसे गमावलीत त्यांचा काळडंख भरून येणार नाही. त्याही पलीकडे जाऊन जे डॉक्टर्स यात हकनाक मरण पावले त्यांच्याविषयी सर्वाच्याच मनात अपार कणव आहे. किती स्वप्ने पाहिली असतील त्यांनी! त्यांना इथेपर्यंत पोहोचता यावे म्हणून त्यांच्या आईवडिलांनी किती खस्ता खाल्ल्या असतील! निमिषार्धात होत्याचे नव्हते झाल्याने किती धक्का बसला असेल!

काही वृत्तवाहिन्यांवरच्या चर्चांमध्ये तज्ज्ञ सांगत होते की, विमान कोसळणार हे सभरवाल यांना लक्षात आल्यावर त्यांनी दोन वेळा ते राईझ करण्याचा प्रयत्न करून काहीशे मीटर अंतर ते पुढे नेले आणि जिथे दाट लोकवस्ती नव्हती तिथे ते कोसळू दिले.

ज्या भागावरून विमान उडत होते तो दाट लोकवस्तीचा भाग होता. त्यामुळे मार्गात येणाऱ्या उंच आणि तुलनेने कमी लोकवस्ती असणाऱ्या इमारतीचा त्यांनी काही सेकंदात वेध घेऊन विमान तिथेपर्यंत नेले आणि मग ते जागेवरच खाली कोसळले.

असे झाले नसते आणि विमान नागरी वस्तीत पडले असते तर बळींची संख्या मोठया प्रमाणात वाढली असती. अर्थात याची पुष्टी तपासातच होईल तोवर ही सगळे गृहीतके असतील. सभरवाल यांनी हे जिवाच्या आकांताने साध्य केले असेल तर हजारो प्राण वाचवल्यासाठी समाज त्यांच्या ऋणात राहील.

सारे जिकडे तिकडे पांगतील, चर्चेचा धुरळा खाली बसेल आणि व्याकुळ आप्तजन आजन्म प्रतिक्षेत राहतील. सुमित सभरवाल यांचे वडील नियतीचा फायनल कॉल येईपर्यंत मुलाच्या लंडनला फ्लाइट लँड झालेल्या कॉलची वाट पाहत राहतील. मागे राहिलेल्या लोकांसाठी अंतिम विदाईचा निरोप अनमोल असतो..- समीर गायकवाड

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!