दौंड मध्ये भिमानदीत आढळलेल्या ७ जणांचा मृत्यू हा ठरला हत्याकांड ! चुलत भावंडांनी अपघाती मृत्यूचा बदला घेण्यासाठी अख्ख कुटूंबच संपविलं…!

दौंड : दौंडच्या भीमा नदीपात्रात तीन चिमुकल्यांसह ७ जणांचा खून झाला. या प्रकरणामध्ये ५ जणांना अटक झाली असून ही पाचही सख्खी भावंडे आहेत. त्यामध्ये ४ सख्खे भाऊ व त्यांचीच एक बहिण आहे.
यामध्ये अशोक कल्याण पवार, शाम कल्याण पवार, शंकर कल्याण पवार, प्रकाश कल्याण पवार, कांताबाई सर्जेराव जाधव या ५ जणांना अटक केली आहे. या सर्वांनी अशोक कल्याण पवारचा मुलगा धनंजय याच्या अपघाती निधनाचा राग मनात धरून नियोजनबध्दरित्या चार जणांचा खून गळा आवळून केला. तर तीन लहान मुलांना क्रूरपणे नदीत फेकून देण्यात आल्याचेही आता उघड झाले आहे.
धक्कादायक बाब अशी की आढळलेल्या सात मृतदेहांबाबत सातत्याने वेगवेगळी कारणे पुढे येत होत्या त्यातच आता पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी मात्र अशा प्रकारची कोणतीही गोष्ट आतातरी आमच्यासमोर आलेली नाही असे स्पष्ट केले. आज दुपारी पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परीषद घेऊन या घटनेची सर्व माहिती दिली. पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहूल धस आदी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिस व पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी बारकाईने तपास केला.
पवार कुटुंब १७ जानेवारी रोजी रात्रीच ठोकलेला आपला तळ काढून तेथून निघून गेले अशी माहिती देणारे त्यांचेच नातेवाईक पारगावच्या आसपास १८ जानेवारीच्या पहाटेपर्यंत फिरकत होते. त्यांचा संपर्क याच ठिकाणी होता. अर्थात जर त्यांना पवार कुटुंब कोठे गेले हे माहिती नव्हते, तर ते येथे काय करीत होते हा प्रश्न चाणाक्ष पोलिसांनी हेरला आणि येथेच तपासाची नवी दिशा ठरली.
यातील खरा प्रकार समोर यावा यासाठी पोलिसांनी गुप्तता पाळली होती.आज पहाटे पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून ४ जणांना अटक केली, तर दुपारी एक वाजता यातील फरार महिलेलाही अटक करण्यात पोलिसांनी यश मिळवले.
मूळच्या बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील, परंतू उदरनिर्वाहासाठी नगरच्या पारनेर तालुक्यातील निघोज येथे राहणाऱ्या या कुटुंबातील मोहन उत्तम पवार ( वय ४८), संगिता मोहन पवार (वय ४५), राणी शाम फुलवरे (वय २५), शाम फुलवरे ( वय २८), रितेश उर्फ भैय्या शाम फुलवरे (वय ७), छोटू शाम फुलवरे (वय५ वर्षे), कृष्णा शाम फुलवरे (वय ३ वर्षे) या सात जणांचे हत्याकांड झाले आहे.
मोहन पवार यांचा पुण्यातील मुलगा राहूल याच्या सांगण्यानुसार मुलाने पळवून नेलेल्या विवाहित मुलीमुळे या कुटुंबाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला. मात्र त्यानंतरही पोलिसांनी तपास सोडला नाही आणि त्यातून आणखी एक धक्कादायक सत्य समोर आले ते म्हणजे मोहन पवार यांचा मुलगा अमोल हा चुलतभाऊ अशोक पवार यांचा मुलगा धनंजय याच्याबरोबर पुण्यात गेला होता. तिथे अपघात झाला आणि धनंजय गंभीर जखमी झाला. त्याला तिथेच सोडून अमोल घरी आला. चार दिवसांनी पुण्यात या अपघातग्रस्त मुलाचा मृत्यू झाला.अमोल त्याच्यासोबत असल्याचे सीसीटिव्हीतून लक्षात आल्याने अमोलनेच घातपात केला असावा असा संशय मोहन पवार यांच्या चुलतभावांमध्ये बळावला होता.
अमोल यानेच आपल्या मुलाचा अपघात घडवून आणल्याचा संशय शाम व प्रकाश पवार या मोहन पवारांच्या चुलतभावांना आला. त्यातून खूनाचा कट रचला गेला.अतिशय हुशारकिने केलेल्या दोन कुटुंबांच्या या खूनाने अख्खा महाराष्ट्र हादरून गेला आहे. या घटनेत दोन कुटुंबे कायमची संपली, तर आता ज्यांनी हा खून केला,ती कुटुंबेही उध्वस्त होतील. एखाद्यावरचा राग त्याच्यापुरता सिमीत न राहता अगदी त्यांचे वंश देखील खुडण्यापर्यंत जात असेल, तर दुर्दैव आहे.