‘मकोका’ ची कारवाई थांबवण्यासाठी 65 लाखांची खंडणी, भयंकर माहिती आली समोर, 5 जणांवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

सोलापूर : कोल्हापूर पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका सहायक फौजदारासह एकूण ५ जणांनी ६५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याबद्दल अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हे सर्वजण कैदेत असलेल्या एका टोळीवरील ‘मकोका’ कायद्यांतर्गत प्रस्तावित केलेली कारवाई रद्द करण्याचे आश्वासन देत होते. सोलापूर जिल्ह्यातून हा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या खंडणी प्रकरणातील फिर्यादी प्रदीप चंद्रकांत माने (वय २५, रा. अकलूज) हे मजुरीचे काम करतात. माने यांच्यावर 14 जून 2025 रोजी झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील १३ आरोपी सध्या तुरुंगात आहेत.

या आरोपींविरुद्ध पोलिसांनी ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करून तो विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या अंतिम मंजुरीसाठी पाठवला आहे. याच ‘मकोका’ची कारवाई रद्द करण्याच्या नावाखाली टोळीने माने यांच्याकडे 65 लाख रुपयांची मोठी खंडणी मागितली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात सहायक फौजदार मिलिंद बळवंत नलावडे (कोल्हापूर पोलिस मुख्यालय) सह सतीश रामदास सावंत (वडाचीवाडी), समीर अब्बास पानारी (हुपरी), कमलेश रमेश कानडे (मुंबई) आणि लाला ऊर्फ लालासाहेब ज्ञानेश अडगळे (अकलूज) अशा एकूण 5 जणांचा समावेश आहे.
संशयित आरोपी समीर पानारी याने कारागृहातील आरोपींचा नातेवाईक असल्याचे सांगून फिर्यादी प्रदीप माने यांना संपर्क साधला. पानारीने माने यांना व्हॉट्सअॅप कॉल करण्यास सांगितले आणि हा संपूर्ण कॉल रेकॉर्ड करण्यात आला. “पैसे नाही दिले तर अवघड होईल” अशी धमकी देत वारंवार खंडणीची मागणी केली.
दरम्यान, अकलूज पोलिसांनी तातडीने कारवाई करत समीर पानारी (28 सप्टेंबर) आणि लाला अडगळे (23 सप्टेंबर) या दोन संशयितांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून या खंडणीच्या कटात सतीश सावंत, कमलेश कानडे आणि सध्या रजेवर असलेला एएसआय मिलिंद नलावडे यांची नावे समोर आली आहेत.
अपर पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर यांनी माहिती दिली की, उर्वरित संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. मकोका कारवाईची गोपनीय माहिती मिळवून या टोळीने खंडणी मागितल्याने, या प्रकरणाचा तपासात खुलासे समोर येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
