त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात तब्बल 5000 भक्तांची फसवणूक ; 5 जणांना अटक

नाशिक : भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी साधारणपणे वीस हजार भाविक येतात, त्यापैकी पाच हजार भाविकांना दोनशे रुपये शुल्क आकारणी देऊन देणगी दर्शन दिले जाते. मात्र नाशिकमधील या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी दिल्या जाणाऱ्या पासेसमध्ये काळाबाजार होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ऑनलाईन दर्शन पासचा काळाबाजार करून भाविकांची लूट करणाऱ्या टोळीचा पोलीसांनी पर्दाफाश करत पाच जणांना अटक केली आहे.

मंदिर परिसरात दर्शन पासचा काळाबाजार करून हे आरोपी बनावट नाव, पत्ता आणि ओळखपत्रांचा वापर करून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन देणगी पास काढून ते भाविकांना ७०० ते १ हजार रुपये दराने विकत होते. पोलिसांच्या या कारवाईमुळे देवाच्या दरबारात भाविकांची लूट करणाऱ्याना चांगलाच दणका बसला आहे.दरम्यान पोलिसांच्या या कारवाईमुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी दोन रांगा ठेवलेल्या आहेत. एक मोफत, तर दुसरी देणगी (प्रति पास २०० रुपये). ऑनलाईन आणि काऊंटरवर उपलब्ध असलेल्या या देणगी पासचा गैरवापर होत असल्याचं माध्यमांतून उघड झालं होतं. या गंभीर प्रकरणाची दखल नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व मंदिराचे अध्यक्ष सचिन भन्साळी यांनी घेतली. त्यानुसार त्र्यंबकेश्वर पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानुसार गुप्त माहितीच्या आधारे पथकाने पाच जणांना ताब्यात घेतलं.
दरम्यान आरोपीनीं तब्बल १६४८ बनावट पास काढल्याचा धक्कादायक तपशील समोर आला. यामधून सुमारे ५ हजार भाविकांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पाच आरोपींविरोधात तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेऊन विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.
