मोठी बातमी! हगवणे पिता-पुत्रांना आसरा दिल्याने माजी मंत्र्यांच्या मुलासह ५ जणांना अटक..

पुणे : शहरातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात पोलिसानी ५ जणांना अटक केली होती. त्यामध्ये, वैष्णवीच्या पती,सासू आणि नणंदेला सर्वात अगोदर अटक करण्यात आली होती. तर, फरार असलेल्या सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे यांस मध्यरात्री बेड्या ठोकल्या होत्या.

त्यांना अटक केल्यानंतर आरोपी हगवणे यांना मदत करणारे पोलिसांच्या रडारवर आले आहेत. दरम्यान, अधिक तपासात त्यांना मदत केल्याप्रकरणी बावधन पोलिसांनी सोमवारी कर्नाटकच्या माजी ऊर्जामंत्र्यांच्या मुलासह पाच जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या पाचही आरोपींना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पुण्यातून पळून गेलेल्या राजेंद्र आणि सुशील यांना आसरा देण्याच्या आणि पळून जाण्यासाठी मदत केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे १७ मे ते २२ मे या कालावधीत अटक टाळण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी लपुन राहीले होते. या कालावधीत त्यांना आसरा देणाऱ्या 5 जणांना बावधन पोलीसांनी अटक केली आहे. त्यामध्ये, राजेंद्र हगवणे यांच्या मित्रासह कर्नाटकमधील एका माजी मंत्र्यांच्या मुलाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रितम वीरकुमार पाटील असं आरोपीचं नाव असून तो माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा आहे.
दरम्यान, मोहन भेगडे (मित्र), मोहन बंडू फाटक (पवना डॅम जवळील फार्म हाऊसचा मालक), अमोल जाधव (सातारा जिल्ह्यातील पुसेगाव मधे हगवणे पिता पुत्रांना फार्म हाऊसवर आसरा देणारा), राहूल जाधव (सातारा जिल्ह्यातील पुसेगाव मधे हगवणे पिता पुत्रांना फार्म हाऊसवर आसरा देणारा ) आणि प्रितम वीरकुमार पाटील (काँग्रेसचे कर्नाटकातील माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा, कर्नाटकातील कोगनोळी या ठिकाणी हगवणे पिता पुत्रांना आसरा दिल्याबद्दल अटक) यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व आरोपींना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.