ठाकरे सेनेच्या ‘त्या’ तीन नेत्यांना 48 तासांचा अल्टिमेटम; नगरसेवक पद रद्द होणार?

मुंबई : नुकत्याच झालेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 11 नगरसेवक निवडून आले. निकाल लागताच उद्धवसेनेचे चार नगरसेवक नॉट रिचेबल झाले.महापौर पदाच्या निवडणुकीत एक नगरसेवक हजर झाल्या मात्र तीन नगरसेवक गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं. आता या तीन नगरसेवकांना 48 तासाचा अल्टिमेटम दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत उद्धव ठाकरे गटाचे तीन नॉट रिचेबल नगरसेवक अडचणीत आले आहेत. गटात सहभागी न झाल्याने त्यांना 48 तासांत खुलासा देण्याची अंतिम नोटीस देण्यात आली असून अन्यथा अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यांनी खुलासा नाही केला तर नगरसेवक पद रद्द करण्याचा इशारा देखील ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे.
ठाकरे गटाचे निवडून आलेले नॉट रिचेबल नगरसेवक कोणत्याही गटा सामील न झाल्याने त्यांना अंतिम इशारा देण्यात आला आहे. तसेच नगरसेवकांचे सदस्य पद रद्द करण्याची प्रक्रिया कोकण विभागीय आयुक्तांना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतचा खुलासा येत्या 48 तासात देण्यात यावा असे जिल्हा प्रमुखांकडून सांगण्यात आले आहे.

निडणूकीचा निकाल लागताच उद्धव सेनेचे नगरसेवक राहूल कोट, मधूर म्हात्रे, किर्ती ढोणे, स्वप्नीनी केणे हे चार नगरसेवक नॉट रिचेबल झाले. महापौर पदाच्या निवडणूकीत किर्ती ढोणे हजर झाल्या. मात्र कोट, म्हात्रे, केणे हे तीन नगरसेवक गैरहजर राहिले.या पश्चात पक्षाचे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी नगरसेवकांना अंतिम नोटिस बजावली आहे. त्यांनी गट स्थापनेच्या प्रक्रियेत सहकार्य केले नाही. ही कृती पक्षाच्या विरोधात आहे. या तीन सदस्यांनी स्वइच्छेने पक्षाचा त्याग केला असे मानले जाऊ शकते.
ही अंतिम नोटिस असल्याने त्यांनी 48 तासात खुलासा केला नाही तर कोकण विभागीय आयुक्तांकडून नगरसेवक अपात्रेतीची कारवाई केली जाईल असा या अंतिम नोटिसद्वारे इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे