पुण्यात ४६ बोगस दिव्यांग शिक्षकांचा पर्दाफाश ; कारवाईची टांगती तलवार

पुणे : पुणे जिल्ह्यातील बोगस दिव्यांग शिक्षकांचा अखेर पर्दाफाश झाला आहे. तब्बल ४६ शिक्षक बोगस दिव्यांग असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार असून आता कारवाई कधी करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील 43 बोगस दिव्यांग शिक्षकांवर कारवाई करण्यासाठी प्रहार संघटनेच्या महिलाध्यक्षा सुरेखा ढवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर जोरदार आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला यश आल्याची भावना व्यक्त करून तातडीने कारवाई करण्याची मागणी सुरेखा ढवळे यांनी केली आहे.जिल्ह्यातील दिव्यांग शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे सादर केलेल्या यादीत अनेक शिक्षक बोगस असून, या बोगस दिव्यांग शिक्षकांनी शिक्षण विभागाची आणि पर्यायाने शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
दरम्यान १९ जुलै ते ३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत जिल्ह्यातील बोगस दिव्यांग शिक्षकाची शोध मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये शासकीय आणि निमशासकीय विभागातून अनेक बोगस दिव्यांगांची आकडेवारी समोर आली. यामध्ये ४०९ दिव्यांग शिक्षकांनी प्रमाणपत्र सादर केली असल्याची माहिती उपलब्ध झाली होती.त्यानुसार शासनाने अखेर ४६ बोगस दिव्यांग शिक्षकांची नावे जाहीर केली आहेत. आता केवळ कागदोपत्री कारवाई न दाखवता शासनाची फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार का पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

त्या बोगस शिक्षकांनी शारीरिकदृष्ट्या सक्षम असताना आणि कोणतेही दिव्यांगत्व नसताना खोटी प्रमाणपत्र घेऊन शासनाची सवलत घेतली आहे. परिणामी वस्तुनिष्ठ दिव्यांग असलेल्या व्यक्तींवर अन्याय झाला आहे. शासनाने बोगस दिव्यांग शिक्षकांची प्रमाणपत्र तपासण्याची मोहीम राबवली आहे. त्यानंतर तब्बल 46 बोगस शिक्षक उघडकीस आले आहेत.